दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांतून फलटण शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे ७ कोटी ३९ लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने भडकमकरनगरमध्ये महिलांकरिता बहुद्देशीय हॉल तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी फूडमॉल आदी विकासकामांचा समावेश आहे, अशी माहिती फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण शहरातील विविध विकासकामांसाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाच्या नगरविकास विभागाकडून ‘वैशिष्ठ्यपूर्ण योजने’अंतर्गत विविध विकास कामांसाठी रुपये ५ कोटी तर महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जिल्हा नियोजन समितीमार्फत २ कोटी ३९ लक्ष ८४ हजार रूपयांचा निधी फलटण नगरपरिषदेस मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले की, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत फलटण नगरपरिषद हद्दीतील भडकमकर नगर येथील खुल्या जागेत महिलांकरिता बहुउद्देशीय हॉल बांधण्याकरिता २ कोटी ३९ लक्ष ८४ हजार रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून नगरविकास विभागाकडून दि.२५ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून फलटण नगरपरिषद हद्दीतील महात्मा फुले शॉपिंग सेंटर लगत फूड मॉल विकसित करण्यासाठी २ कोटी रुपये, दत्तनगर शिंदे इमारत ते दगडी पूल ते हनुमान मंदिर ते वेलणकर दत्त मंदिर बंदिस्त नाला बांधण्याकरिता १ कोटी ९५ लक्ष रुपये, पद्मावतीनगर येथील अंतर्गत रस्ते विकसित करण्यासाठी ९० लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक ११ मधील खुशी अपार्टमेंट ते जाधव घरापर्यंत रस्ता विकसित करण्यासाठी १५ लक्ष रुपये असा एकूण सुमारे ७ कोटी ३९ लक्ष ७४ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.