“१० दिवस रक्ताचं पाणी केलं, आता पुन्हा शर्यत का?” निवडणूक लांबल्याने फलटणच्या उमेदवाराचा आक्रोश. “साहेब, माझं काय चुकलं?” व्हायरल पत्र वाचाच…


  • फलटण-महाबळेश्वर निवडणूक २० दिवस पुढे गेल्याने उमेदवारांचा हिरमोड

  • “आम्ही नियमाने वागलो, १० दिवस रक्ताचं पाणी केलं, आता पुन्हा शर्यत का?”

  • एका व्यथित उमेदवाराचे प्रशासनाला लिहिलेले खुले पत्र चर्चेत

  • कोणाला तरी न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होतोय का? उपस्थित केला सवाल

स्थैर्य, फलटण, दि. 02 डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदेची निवडणूक २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासकीय पातळीवर तांत्रिक पूर्तता झाली असली तरी, गेल्या १० दिवसांपासून उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या उमेदवारांच्या मनोधैर्याचे मात्र खच्चीकरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर फलटणमधील एका ‘व्यथित उमेदवारा’ने प्रशासनाला उद्देशून लिहिलेले “साहेब! माझं काय चुकलं?” हे खुले पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, ते प्रत्येक उमेदवाराच्या मनातील घालमेल मांडणारे ठरले आहे.

“१० दिवसांच्या कष्टाचं मोल काय?”

पत्रात उमेदवाराने म्हटले आहे, “निवडणुकीचे बिगुल वाजले आणि आम्ही उत्साहाने कामाला लागलो. छाननी झाली, अर्ज वैध ठरले आणि तुमच्या आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत राहून आम्ही प्रचार सुरू केला. वेळेचे बंधन पाळले, कार्यकर्ते रात्रंदिवस राबले. पण आता अचानक निवडणूक २० दिवस पुढे गेली. मग आम्ही गेल्या १० दिवसांत केलेला प्रचार, पायाचे तुकडे पडपर्यंत घातलेली पायपीट आणि मतदारांशी साधलेला संवाद… या कष्टाचं काहीच मोल नाही का साहेब?”

शर्यत सुरू झाली अन रद्द झाली…

प्रशासनाच्या निर्णयावर मार्मिक भाष्य करताना उमेदवाराने पत्रात लिहिले आहे, “तुम्ही शिट्टी फुंकली, ‘स्टार्ट’ म्हणालात आणि आम्ही जीवाच्या आकांताने सुसाट पळत सुटलो. पण आता शर्यत रद्द झाली म्हणताय. म्हणजे आमच्या कष्टाला काहीच अर्थ नाही का? आता पुन्हा नव्याने प्रचार करायचा का? यासाठी लागणारी ऊर्जा, शक्ती आणि मानसिकता पुन्हा कशी आणायची?”

न्याय की अन्याय?

न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक लांबणीवर पडली, यावर बोट ठेवताना उमेदवाराने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. “तुम्ही कोणाला तरी (अपीलकर्त्याला) न्याय देत आहात, तो कायद्याने बरोबर असेलही. पण एकाला न्याय देताना कायद्याचे पालन करणाऱ्या दुसऱ्या उमेदवारांवर अन्याय होतोय का, याचाही विचार व्हायला हवा होता,” अशी खंत या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

उमेदवारांची आर्थिक आणि मानसिक कोंडी

हे पत्र जरी एका अनामिक उमेदवाराचे असले, तरी ती फलटणमधील सर्वच पक्षीय आणि अपक्ष उमेदवारांची प्रातिनिधिक भावना आहे. निवडणूक लांबल्याने प्रचाराचा खर्च वाढणार आहे, कार्यकर्त्यांना सांभाळणे कठीण होणार आहे आणि मतदारांपर्यंत पुन्हा पुन्हा जावे लागणार आहे. त्यामुळे “माझी काही चूक नसताना माझ्यावर हा अन्याय का?” हा सवाल या पत्रातून विचारला गेला आहे.


Back to top button
Don`t copy text!