
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही मदत न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरसकट पंचनामे व भरघोस मदतीसाठी तहसीलदारांना निवेदन दिले.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑक्टोबर : फलटण तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. पावसामुळे पिके जळून गेल्याने सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, कांदा आणि उसाचे ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार अभिजित जाधव यांना निवेदन देऊन सर्व गावांत सरसकट पंचनामे करण्याची आणि तातडीने भरघोस मदत देण्याची मागणी केली आहे.
सरसकट पंचनामे आणि मदतीची मागणी
अनेक भागांत पिके वरून हिरवी दिसत असली तरी जमिनीत ओलावा नसल्याने दाणे भरण्याची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे केवळ निवडक गावांत पंचनामे न करता तालुक्यातील प्रत्येक गावात व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. निवेदनात हिरव्या दिसणाऱ्या पिकांचेही पंचनामे समाविष्ट करणे, शेतसारा, वीजबिल व शैक्षणिक फी माफ करणे तसेच जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींचे वेतन बंद करून निधी देण्याचा इशारा
राज्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे वेतन तसेच माजी लोकप्रतिनिधींचे पेन्शन बंद करून तो निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरावा, अशी आक्रमक भूमिका संघटनेने मांडली आहे. तसेच मोबाईल ॲपद्वारे केलेली पीक पाहणी ४८ तासांत सातबारा उताऱ्यावर नोंदवण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून प्रसंगी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, प्रमोद गाडे, डॉ. रवींद्र घाडगे आणि विक्रम पवार उपस्थित होते.



