दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फलटण-कोरेगाव मतदारसंघाला गेले १५ वर्षे दोन आमदार असतानाही हा मतदारसंघ पाणी, रस्ते अशा मूलभूत गोष्टींसह एमआयडीसीच्या विकासापासून वंचित राहिला आहे. यासाठी येथील श्रीमंत आणि आमदार दीपक चव्हाण हेच कारणीभूत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.
फलटण विधानसभा मतदारसंघातील पिंपोडे (ता. कोरेगाव) येथे महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवरुपराजे खर्डेकर, प्रल्हाद साळुंखे-पाटील, बाळासाहेब सोळस्कर, आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, फलटणचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे यांनी सत्ता असतानाही फलटण, कोरेगावचा विकास केला नाही. येथील शेतकर्यांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे. आपला श्रीराम साखर कारखाना जवाहरला चालविण्यास दिला. बाजार समितीची दुर्दशा करून टाकली आहे. दूध उत्पादक संघ, खरेदी-विक्री संघ तालुक्यात दिसत नाहीत. मालोजीराजे बँक दुसर्या बँकेला चालविण्यास दिली आहे. एकही संस्था त्यांनी नीट चालविली नाही. संधी असतानाही त्यांनी फलटण मतदारसंघात दुष्काळ निधी आणला नाही. रामराजे ‘श्रीमंतां’सारखेच वागत आले आहेत.
आमदार दीपक चव्हाण यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले की, दीपक चव्हाण यांच्याकडे तीन टर्म आमदारकी असूनही त्यांनी फलटण-कोरेगाव मतदारसंघाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. मी त्यांना विकासासाठी निधी देण्यास कायम तयार असतानाही ते ‘श्रीमंतां’ना विचारले पाहिजे, श्रीमंतांना डावलून चालणार नाही, असेच म्हणत आले आहेत.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळक़र यांच्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, माजी खासदार रणजितसिंह यांनी फलटण-कोरेगावच्या शेतकर्यांना ०.५२ टीएमसी पाणी मिळण्यासाठी बरेच कष्ट घेतले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निरा-देवघरचे ०.५२ टीएमसी अतिरिक्त पाणी फलटण व कोरेगाव तालुक्याला मंजूर करून घेतले आहे.
उमेदवार सचिन पाटील हे शेतकरी असून सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा माणूस असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. महायुतीचे सरकार राज्यात आल्यास उत्तर कोरेगाव तालुक्यातील २६ गावांचा पाणीप्रश्न सुटेल, असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले.
माझ्या लाडक्या बहिणीच महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात निवडून आणणार आहेत, असाही विश्वासही यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला.
उमेदवार सचिन पाटील म्हणाले की, मी उत्तर कोरेगाव भागातील या पिंपोडेचाच सुपुत्र आहे. माझे पूर्वज या गावात राहिले आहेत. त्यामुळे या भागाचा विकास झाला पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. गेले १५ वर्षे येथील आमदारांनी सत्ता असतानाही या भागाचा महत्त्वाचा असलेला पाणीप्रश्न सोडविलेला नाही. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आपण या भागातील २६ गावांसाठी ०.५२ टीएमसी पाणी मंजूर करून घेतले आहे. मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकर्यांच्या प्रश्नांची कळकळ मला आहे. महायुतीचे सरकार २६ गावांचा पाणीप्रश्न सोडवेल, अशी मला खात्री आहे.
या सभेत माजी खासदार रणजितसिंह यांच्यासह इतर मान्यवरांचीही भाषणे झाली.