फलटणमध्ये देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा! जाधववाडीतील ‘ऑरेंज लॉज’वर कारवाई; डमी गिऱ्हाईक पाठवून पर्दाफाश, एकाला अटक


फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील ‘ऑरेंज लॉज’वर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवून पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी माण तालुक्यातील एका तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 27 फेब्रुवारी : फलटण तालुक्यातील जाधववाडी गावच्या हद्दीत असलेल्या ‘ऑरेंज लॉज’वर छापा टाकून फलटण शहर पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा (वेश्या व्यवसाय) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

असा टाकला छापा; डमी गिऱ्हाईकाचा वापर

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल कृष्णा खांबे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जाधववाडी येथील ‘ऑरेंज लॉज’ येथे प्रविण रामचंद्र दडस (रा. टाकेवाडी, ता. माण) हा इसम वेश्या व्यवसाय चालवत आहे. या माहितीची खात्री केल्यानंतर श्री. खांबे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.

मिळालेल्या सूचनेनुसार, पोलिसांनी ऑरेंज लॉजवर एक ‘डमी गिऱ्हाईक’ पाठवले. डमी गिऱ्हाईकाने खात्री करून इशारा करताच पोलिसांनी लॉजवर अचानक छापा टाकला. यावेळी आरोपी प्रविण रामचंद्र दडस (वय २६ वर्षे, रा. टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा) हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता एका महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन दि. २५ फेब्रुवारी रोजी अटक केली.

२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

याप्रकरणी प्रविण दडस याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२), १४४(२) सह ‘स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६’ चे कलम ४ व ५ प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपीला दि. २६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PC) मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक अरविंद काळे हे करत आहेत.

छापा टाकणारे पोलीस पथक

सदरची धडक कारवाई सातारा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल कृष्णा खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती विजयमाला गाजरे, तसेच पोलीस अंमलदार सचिन भोसले, नितीन सजगणे, बापूराव धायगुडे, दत्तात्रय नाळे, दत्तात्रय लवटे, गणेश अवघडे, निखील गायकवाड यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!