‘मलठण’च्या सराईत टोळीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! दहशत माजवणारे दोन गुंड साताऱ्यासह तीन जिल्ह्यांतून २ वर्षांसाठी हद्दपार; गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ


फलटण शहरात दहशत माजवणाऱ्या मलठण येथील अनिकेत बनसोडे टोळीवर सातारा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. विनयभंग, हाणामारी आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागांतून सलग दोन वर्षांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 16 फेब्रुवारी : फलटण शहर आणि तालुक्यात दहशत माजवून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर सातारा पोलिसांनी आता थेट ‘हंटर’ चालवण्यास सुरुवात केली आहे. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मलठण (फलटण) येथील अनिकेत बनसोडे याच्या सराईत टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई करत, टोळीप्रमुख आणि एका सदस्याला संपूर्ण सातारा जिल्ह्यासह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून सलग २ वर्षांसाठी ‘हद्दपार’ (तडीपार) केले आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या या धडक आदेशामुळे फलटणच्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या सराईत गुन्हेगारांवर झाली कारवाई:

१. अनिकेत सुभाष बनसोडे (टोळी प्रमुख, वय २२ वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, मलठण, फलटण)

२. अर्जुन राजु जाधव (टोळी सदस्य, वय १९ वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, मलठण, फलटण)

‘या’ भयंकर गुन्ह्यांमुळे झाली हद्दपारी:

वरील टोळीने फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मार्गाने दहशत आणि बळाचा वापर करून उच्छाद मांडला होता. या टोळीवर नागरिकांना गंभीर दुखापत पोहोचवणे, विनयभंग करणे, बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे आणि चोरी करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यापूर्वी त्यांच्यावर वेळोवेळी अटक आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, कायद्याचा कोणताही धाक न बाळगता त्यांनी आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. त्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे सर्वसामान्य जनतेतून कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली होती.

असा आवळला हद्दपारीचा फास:

वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे हद्दपारीचा सविस्तर प्रस्ताव सातारा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. या प्रस्तावाची सखोल चौकशी फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल कृष्णा खांबे यांनी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर सुनावणी होऊन, त्यांनी या टोळीला थेट २ वर्षांसाठी हद्दपार करण्याचे अंतिम आदेश पारित केले.

येथे फिरकण्यास सक्त मज्जाव:

या आदेशानुसार, अनिकेत बनसोडे आणि अर्जुन जाधव यांना संपूर्ण ‘सातारा जिल्हा’, पुणे जिल्ह्यातील ‘बारामती’ व ‘पुरंदर’ तालुका, तसेच सोलापूर जिल्ह्यातील ‘माळशिरस’ तालुक्यातून आगामी २ वर्षे कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या काळात ते या हद्दीत दिसल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील.

भविष्यात ‘मोक्का’ अन् ‘एमपीडीए’ लावणार!

सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यापुढेही सराईत गुन्हेगारांवर हद्दपारी, ‘मोक्का’ (MCOCA) आणि ‘एमपीडीए’ (MPDA) यांसारख्या कठोर कारवाया केल्या जातील, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

ही धडक कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पो.हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस आणि फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. जितेंद्र टिके यांनी योग्य पुराव्यांसह पार पाडली.


Back to top button
Don`t copy text!