
फलटण येथे ‘दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर’ न्यायालय स्थापनेसाठीच्या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाली असून आर्थिक तरतूद मंजूर झाली आहे. फलटण बार असोसिएशनच्या एकजुटीला आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 04 जानेवारी : फलटण वकील संघ आणि पक्षकारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. फलटण येथे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ‘दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर’ (Civil Judge Senior Division) न्यायालय स्थापनेचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. या न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाली असून, आर्थिक तरतूद झाल्याबाबतचे पत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा यांना प्राप्त झाले आहे.
फलटण बार असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, आता केवळ न्यायालयाच्या उद्घाटनाची औपचारिकता बाकी राहिली आहे. हे न्यायालय फलटणमध्ये सुरू व्हावे, यासाठी फलटण वकील संघातील सर्व सन्माननीय सभासदांनी एकजुटीने प्रयत्न केले होते. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज यश मिळाले आहे.
लोकप्रतिनिधींचे विशेष सहकार्य
या महत्वपूर्ण कामात लोकप्रतिनिधींनी मोलाची भूमिका बजावली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी या प्रश्नी विशेष लक्ष घालून शासन दरबारी प्रयत्न व सहकार्य केले. त्याबद्दल फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीने त्यांचे विशेष अभिनंदन व आभार मानले आहेत.
या निर्णयामुळे फलटणमधील पक्षकारांना आणि वकिलांना सातारा येथे जाण्याचा त्रास वाचणार असून, स्थानिक पातळीवरच वरिष्ठ स्तरावरील दिवाणी दाव्यांचे कामकाज चालणे सुलभ होणार आहे.

