दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
सध्या फलटण नगर परिषदेला मुख्याधिकारी नसल्याने फलटण शहर वार्यावर पडले आहे. त्यामुळे नगर परिषदेचे कामकाज ठप्प झाले असून कारभाराच्या तीनतेरा वाजल्या आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची बदली ही कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे झाली आहे. त्यांनी अद्यापही नगरपरिषदेचा अधिकृत चार्ज सोडला नसल्याचे कळत आहे; परंतु बदली आदेश निर्गमित झाल्यापासून मुख्याधिकारी संजय गायकवाड हे आपला फोन ‘स्वीच ऑफ’ करून बसले आहेत. त्यामुळे फलटण शहर वार्यावर पडले आहे.
मुख्याधिकारी नसल्याने फलटणकर नागरिकांना मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाहीत. फलटण शहराला नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत.
फलटण शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले असून प्रत्येक चौकात व मुख्य रस्त्यावर कचरा उघड्यावर पडला आहे. यामुळे प्रवास करताना सुद्धा नागरिकांना घाणेरडा वास सहन करावा लागत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून जी विकासकामे सुरू आहेत, तीसुद्धा मुख्याधिकारी नसल्याने खोळंबली आहेत. फलटण नगरपरिषदेत जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यामध्ये सफाई कर्मचारी, आस्थापना येथील कर्मचारी यांचे पगार झाले नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोषाची भावना वाढू लागली आहे.
त्यामुळे फलटण नगर परिषदेला ताबडतोब नवीन मुख्याधिकारी द्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांची आहे.