खंडाळा-फलटण तालुक्यांचे पाणी आज होणार बंद

‘धोम’मध्ये सात टीएमसी पाणी लाभक्षेत्रास ठेवणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १२ फेब्रुवारी २०२४ | सातारा |
बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटण तालुक्यात सुरू असलेले धोम धरणाचे पाणी विहीत मंजूर पाणी संपल्यानंतर आजपासून बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभक्षेत्रात चालू आवर्तन आणि उन्हाळी आवर्तनासाठी धोम जलाशयातून सात टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिली.

खंडाळा आणि फलटणला धोम धरणातील बलकवडी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत होते, ते त्वरित थांबवावे व धोम धरण लाभक्षेत्रातील शेतीला हक्काचे मंजूर पाणी वेळेत मिळावे, या मागणीसाठी ३० जानेवारी २०२४ रोजी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीसह शेतकर्‍यांनी कोरेगाव तहसील कचेरीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. उपोषण सोडताना सिंचन मंडळाच्या अधिकार्‍यांनी उपोषणस्थळी येऊन समितीच्या सर्वच मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल सातारा येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्यासोबत चर्चा झाली. त्यात सर्वांनी सकारात्मक चर्चा करत धोम धरणातून बलकवडी बोगद्याद्वारे खंडाळा व फलटण तालुक्यात सुरू असलेले विहीत मंजूर पाणी समाप्त होताच ते आजपासून बंद करण्यात येईल. यानंतर कोणत्याही कारणास्तव बलकवडी कालव्यातून पाणी सोडले जाणार नाही, अशी हमी देण्यात आली. त्यानंतर लाभक्षेत्रात चालू असलेले आवर्तन आणि उन्हाळी आवर्तनासाठी धोम जलाशयात सात टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे धोम लाभक्षेत्रातील उन्हाळी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

या बैठकीस संघर्ष समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, उदयसिंह बर्गे, प्रणव बर्गे, सुधाकर बर्गे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!