फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीची राज्यस्तरीय पुरस्काराची हॅटट्रीक

'वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्काराने' सलग तिसऱ्यांदा सन्मानित


स्थैर्य, फलटण, दि. १८ सप्टेंबर : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्याची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार-२०२५’ फलटण बाजार समितीने पटकावला आहे. उत्कृष्ट कार्य करणारी बाजार समिती म्हणून मिळालेला हा सन्मान सलग तिसऱ्या वर्षी प्राप्त झाल्याने फलटण बाजार समितीने राज्यस्तरीय पुरस्काराची हॅटट्रिक साधली आहे.

पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात समितीच्या संचालिका सौ. जयश्री गणपत सस्ते यांनी समितीचे उपाध्यक्ष श्री. भगवानराव होळकर, उपस्थित संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांसमवेत हा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या कल्पक दूरदृष्टीतून बाजार समितीची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बाजार समितीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक, शेतमालाला जास्तीत जास्त दर, ई-नाम प्रणालीचा प्रभावी वापर, वेळेवर लेखापरीक्षण, उत्पन्नात वाढ आणि शासनाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी यांसारख्या निकषांमध्ये केलेल्या गुणवत्तापूर्वक कामाची दखल घेऊन समितीला या पुरस्काराने गौरवण्यात आले. यापूर्वी समितीला ‘स्मार्ट’ रँकिंगमध्ये जिल्ह्यात सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक आणि ‘नवराष्ट्र नवभारत टाइम्स’चा ‘बेस्ट एपीएमसी’ पुरस्कारही मिळाला आहे.

या यशाबद्दल समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी हे यश समितीचे संचालक मंडळ, सचिव शंकरराव सोनवलकर आणि सर्व कर्मचारी यांच्या सांघिक कामगिरीचे, तसेच आवक आणणारे शेतकरी, अडते, हमाल, मापाडी व इतर सर्व घटकांच्या सहकार्याचे फलित असल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले.

या पुरस्काराबद्दल राज्याचे पणन मंत्री श्री. जयकुमार रावल, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार श्री. दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राज्याचे पणन संचालक श्री. विकास रसाळ, जिल्हा उपनिबंधक श्री. संजयकुमार सुद्रीक यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाजार समितीचे अभिनंदन केले आहे.

पुरस्कार सोहळ्यावेळी समितीचे उपाध्यक्ष श्री. भगवानराव होळकर, संचालक सर्वश्री टी.डी. शिंदे, सचिन लोखंडे, शंभुराज पाटील, प्रविण खताळ, चांगदेव खरात, अक्षय गायकवाड, संतोष जगताप, संजय कदम, निलेश कापसे आणि सचिव श्री. शंकरराव सोनवलकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!