
फलटण कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी सासकल येथे ‘सहभागी ग्रामीण मूल्यांकन’ (PRA) उपक्रम राबविला. रांगोळीच्या माध्यमातून गावचा नकाशा, पिके आणि साक्षरतेची माहिती मांडत शेतकऱ्यांचे प्रबोधन केले.
स्थैर्य, फलटण, दि. ०४ जानेवारी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न आणि फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सासकल (ता. फलटण) येथे एक अनोखा उपक्रम राबवला. ‘ग्रामीण जागरूकता कार्यानुभव’ (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषीदुतांनी ‘सहभागी ग्रामीण मूल्यांकन’ (PRA – Participatory Rural Appraisal) तंत्राचा वापर करत चक्क रांगोळीच्या माध्यमातून संपूर्ण गावाची कुंडलीच ग्रामस्थांसमोर मांडली.
ग्रामीण भागाचा विकास साधताना त्या गावाची भौगोलिक आणि सामाजिक माहिती असणे आवश्यक असते. हे महत्त्व ओळखून कृषीदुतांनी सासकल गावाचे सर्वसाधारण नकाशे, जलकुंभ, विविध सरकारी कार्यालयांचे स्थापना वर्ष, साक्षरतेचे प्रमाण दर्शवणारे चार्ट आणि वार्षिक पीक पद्धतीचा चार्ट (Annual Crop Chart) तयार केला. विशेष म्हणजे, ही सर्व क्लिष्ट माहिती कागदावर न मांडता जमिनीवर रांगोळीच्या साहाय्याने रेखाटण्यात आली होती. या दृश्य स्वरूपामुळे उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांना आपल्या गावाची सांख्यिकीय आणि भौगोलिक स्थिती समजून घेणे सोपे झाले.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे आणि प्रा. एन. ए. पंडित यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
गावातील माहिती संकलित करून ती रांगोळीतून साकारण्यासाठी कृषीदूत प्रसाद मुळीक, आदित्य पवार, सुमित शेवाळे, स्वरूप चव्हाण, गौरव भोसले, श्रीराज मांजरकर, तेजस शिंदे आणि श्रेयश शिंगाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सासकल गावातील अनेक शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या या कष्टाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

