स्थैर्य, फलटण, दि. २८: फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाजार समिती असुन या बाजार समितीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी तालुक्यामध्ये पेट्रोल पंप, पशुवैद्यकीय दवाखाना, तसेच कार्डियाक अँबुलन्स व शेतकऱ्यांच्या हितासाठी अन्नदाता सन्मान योजना तसेच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्यामुळे फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्याला दिशादर्शक अशीच असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीने ऑनलाइन आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, प्रा. भिमदेव बुरुंगले, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, संतोष खटके, बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, संचालक मोहनराव निंबाळकर, प्रकाश भोंगळे, शिवाजीराव लंगुटे, राजुरीचे सरपंच सचिन पवार यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे श्रीमंत रामराजे म्हणाले की, फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रयोगशील राहावे, एकेकाळी आपल्या तालुक्यांमध्ये उसाबरोबरच कापसाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होत होते. परंतु मध्यंतरी शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेण्याचे थांबविले होते. आता पुन्हा कापसाच्या पिकाकडे शेतकरी वळू लागला आहे. कारण तालुक्यातील जमिनीचा पीएच व्हॅल्यू कापूस उत्पादनासाठी चांगला असल्यामुळे भविष्यामध्ये कापसाचे उत्पादन वाढणार असल्याचे लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीने सरकारमान्य कापूस खरेदी विक्री केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असेही शेवटी श्रीमंत रामराजे म्हणाले.
प्रस्ताविकामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी गेल्या वर्षभरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने राबविलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाचा तसेच कामकाजाचा आढावा सादर केला. वार्षिक सर्वसाधारण सभेमधील मधील ठरावाचे वाचन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले यावेळी सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायकराव पाटील यांनी केले.