कांदा अनुदानासाठी शेतकर्‍यांनी अर्ज करण्याचे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत २० एप्रिल २०२३ पर्यंत कांदा अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकर्‍यांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

बाजार समित्यांमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना ३५० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी यानुसार अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनुदान देण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत २० एप्रिल २०२३ पर्यंत आहे. शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सकाळी ९.३० ते ४.३० पर्यंत प्रस्ताव व अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, फलटण श्री. सुनील धायगुडे व सचिव श्री. शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.

शेतकर्‍यांनी अर्ज, कांदा विक्रीची मूळ पट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड स्वत: प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत, बँकेतील बचत खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स इ. कागदपत्रे जमा करावीत.

सातबारा उतार्‍यावर वडिलांचे नावे, विक्री पट्टी, मुलाच्या वा अन्य कुटुंबांचे नाव आहे अशा प्रकरणात वडील, मुलगा व अन्य कुटुंबियांनी सहमतीपत्र अथवा शपथपत्र सादर करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर सातबारा उतारा ज्याच्या नावे असेल त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे. विहीत नमुन्यातील अर्ज बाजार समितीमध्ये विनामूल्य उपलब्ध आहेत, फलटण बाजार समितीने सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!