स्थैर्य, फलटण : कोरोनामुळे देशात सुरू झालेलं लॉकडाऊन हे महाराष्ट्रांत अजून महिनाभर वाढणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज (ता. 29 जूनला) राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवणार असल्याचं एका आदेशाद्वारे नुकतेच जाहीर केलं आहे. राज्यात कंटेनमेंट झोन बाहेरील निवासी व्यवस्था असलेल्या हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 8 जुलैपासून हॉटेल सुरू होणार आहेत. पण जितकी हॉटेलची क्षमता असेल त्याच्या 33 टक्केच लोकांना राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. शॉपिंग मॉल बंद राहतील असे राज्य सरकारने सांगितले आहे. परंतू सदरील आदेशाची किंवा शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशांची अमंलबजावणी फलटण शहरात व तालुक्यात कोणत्या प्रकारे होणार आहे, याची माहिती नागरिकांना देण्याचे काम फलटणच्या प्रशासनाने करावे, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व आर्यमान फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी – बेडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेली आहे.
सध्या केंद्र व राज्य शासनाकडून विविध आदेश नियमित निर्गमित होत आहेत. त्यातील काही आदेशांची आपल्या येथे त्वरित अमंलबजावणी केली जाते तर काहींची अमंलबजावणी हि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केली जाते. परंतु ह्या सर्व प्रक्रिये मध्ये सर्वसामान्य नागरिकांची द्विधा मनस्थिती निर्माण होते. व त्यातूनच काही गैरसमज तयार होतात. त्या मुळे फलटण येथील प्रशासनाने नियमित आध्यायावत नागरिकांना द्यावेत, जेणे करून नागरिक द्विधा मनस्थिती अथवा गैरसमज तयार होणार नाहीत. फलटण तालुक्यात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्याना परवानग्या पुढील काही काळासाठी बंद ठेवाव्यात व फलटण तालुक्यामध्ये आगामी काही दिवसात कडक संचारबंदी लागू करावी असेही महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी – बेडके यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.