माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी फलटण प्रशासन सज्ज; तालुक्यात तीन मुक्काम, आठ विसावे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२३ | फलटण |
आषाढी वारीसाठी निघालेला ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दि. २० जून २०२३ रोजी फलटण तालुक्यात प्रवेश करत आहे. फलटण तालुक्यामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यात एक उभे रिंगण (चांदोबाचा लिंब), तीन मुक्काम (तरडगाव, फलटण, बरड) व आठ विसावे आहेत. माऊलींच्या या पायी वारीच्या अनुषंगाने फलटण प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी फलटण तहसीलदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तहसीलदार समीर यादव यांनी प्रमुख उपस्थिती होती.

याबाबत माहिती देताना सचिन ढोले म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये वारकर्‍यांना पाणी पुरवठ्यासाठी सुमारे ६५ शासकीय टँकर्सची व्यवस्था केली असून दिंड्यांसोबत असणार्‍या ४५०-५०० टँकर्ससमवेत सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. फलटण तालुक्यामध्ये २३ ठिकाणी टँकर भरण्यासाठी ३४ पॉईंट उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रतिदिन ७०० पेक्षा जास्त टँकर भरण्याची क्षमता आहे. तसेच पालखी मार्गावरील पाणी शुद्धीकरणासाठी १९ पथके नियुक्त केली आहेत. सर्व ठिकाणची पाण्याची तपासणी आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.

तरडगाव, फलटण व बरड मुक्कामी पालखी असताना प्रत्येक ठिकाणी १५०० तात्पुरती शौचालये उभारण्यात येत आहेत. तात्पुरत्या शौचालयांच्या स्वच्छतेसाठी वेगळे कर्मचारी नेमण्यात आले असून पाणी पुरवठ्यासाठीही वेगळ्या टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यामधील काही तात्पुरती शौचालये इतरत्र मुक्कामी असणार्‍या दिंड्यांच्या ठिकाणी व विसाव्यांच्या ठिकाणीही ठेवण्यात येणार आहेत. मागील वर्षापेक्षा ५०० तात्पुरती शौचालये अधिक उभारण्यात येत आहेत.

पालखी तळाच्या ठिकाणी मुक्कामापूर्वी, मुक्कामादरम्यान व मुक्कामानंतरच्या स्वच्छतेसाठी संबंधित ग्रामपंचायत व नगर परिषदेने संपूर्ण नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी यांनी पालखी तळ व शौचालयांच्या स्वच्छतेसाठी जिल्हास्तरावरून अतिरिक्त १५० कर्मचारी उपलब्ध करून दिलेले आहेत. संपूर्ण पालखी काळामध्ये आरोग्य विभागाकडील १४ स्थिर पथके वारकर्‍यांना सेवा देण्यासाठी नेमण्यात आली आहेत. तसेच दुचाकीवरील १७ आरोग्यदूत पथके वारकर्‍यांना प्रथमोपचार सुविधा देतील. पालखी मार्गावर प्रत्येक किलोमीटरला एक रुग्णवाहिका अशा ३३ रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. चार कार्डियाक रुग्णवाहिका देखील ठेवण्यात येणार आहेत. पालखी काळामध्ये तालुक्यामधील १९० बेडस् वारकर्‍यांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तसेच फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हास्तरावरून वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांची नेमणूक पालखी काळासाठी करण्यात आली आहे.

पालखी मुक्काम व टँकर भरण्याच्या ठिकाणी वीजपुरवठा अखंडित राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच वारकर्‍यांना तात्पुरती वीज जोडणीही सहजरित्या उपलब्ध करून दिली जाणार आहे. वारकर्‍यांना पायी चालताना उन्हापासून संरक्षणासाठी १७ मंगल कार्यालये व ८ पेट्रोलपंपांच्या ठिकाणी विश्रांतीगृहे तयार करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी तात्पुरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पोलीस विभागामार्फत पालखी सोहळ्यासाठी पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच वारीमधील भुरट्या चोरांच्या बंदोबस्तासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. महिलांसाठी प्रत्येक तळावर २४ बाय ७ कार्यरत राहणारे निर्भया पथक ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पालखी मार्गावर आठ ठिकाणी बंद पडलेल्या वाहनांना बाजूला करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पालखी तळाच्या ठिकाणी दोन अग्निशमन वाहने स्थापित केली जाणार असून पोलिसांकडील वाहनांमध्ये ५० अग्निशमन सिलेंडर्स ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या सोईसाठी फलटण तहसील कार्यालय येथे २४ बाय ७ कार्यरत राहणारे कंट्रोल रूम दि. १८ जून ते २३ जूनदरम्यान स्थापित केले असून त्याचा संपर्क क्रमांक ०२१६६-२२२२१० असा आहे. प्रशासनामार्फत सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक असल्याची संपर्क पुस्तिका तयार करण्यात आली असून सर्व दिंड्यांना त्या पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

फलटण प्रशासनाकडून माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सर्व वारकर्‍यांच्या सोईसाठी आवश्यक सुविणा देण्यात येत असून त्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल्याचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!