स्थैर्य, दि.८: दोन वर्षांच्या विक्रमी दराने
विकत असलेले पेट्रोल-डिझेल आणखी महाग होऊ शकते. तज्ञांच्या मते, केंद्र
किंवा राज्य सरकारांनी पेट्रोल-डिझेलवर कर कमी केले नाहीत तर पुढील दोन
महिन्यांत पेट्रोलचे दर १०० रु./लिटरवर जातील. आंतरराष्ट्रीय स्तरावर
कच्च्या तेलाच्या (क्रूड) दरात झालेली वाढ हे त्याचे कारण आहे.
ऑक्टोबरमध्ये क्रूडचा सरासरी दर ३५.७९ डॉलर प्रति बॅरल होता, तो
नोव्हेंबरमध्ये वाढून ४५.३४ डॉलर प्रति बॅरल झाला. म्हणजे एक महिन्यात
क्रूडच्या दरात २६.६८% वाढ झाली.
केडिया
अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांनी शेल क्रूडचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले
होते. त्यामुळे अमेरिका कच्च्या तेलाचा आयातदार होण्याऐवजी निर्यातदार
झाला. आता नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी हे प्रोत्साहन देणार नाही,
असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमेरिका पुन्हा आयातदार होईल. कोरोना लस
तयार झाल्यानंतर आर्थिक घडामोडी वाढतील. त्यामुळे क्रूडच्या मागणीत वाढ
होऊन दरही वाढतील.
जीएसटी लागू झाल्यास सर्वाधिक स्लॅबमध्येही पेट्रोल ३७ रु./लिटर मिळेल
पेट्रोल-डिझेलला
जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा मुद्दा चर्चेत आहे. तसे झाल्यास आणि पेट्रोलला
सर्वाधिक कर स्लॅबमध्येही (२८%) टाकले तरीही एक लिटर पेट्रोलचा दर जवळपास
३७ रुपये असेल.
मेमध्ये वाढलेल्या अतिरिक्त अबकारी कराचा परिणाम
केंद्र
सरकारने या वर्षी दोनदा पेट्रोलवर १७ रु./लि. आणि डिझेलवर १६ रु./लि.
अबकारी कर वाढवला आहे. अबकारी करावरही राज्य सरकारे व्हॅट वसूल करतात.
त्यामुळे दर २० रु. पर्यंत वाढले आहेत.