
स्थैर्य, फलटण : डॉ.श्रीकांत कृष्णराव मोहिते यांनी पशुसंवर्धन खात्यातील जिल्हा पातळीवर महत्त्वाचे असणारे पशुप्रांत हे पद 18 वर्षे सांभाळले. या खात्यात अविरतपणे सेवा करुन ते सेवानिवृत्त झाले खरे परंतू गेली 18 वर्षे फलटण व वाई तालुक्यातील पंचक्रोशीत मोहित डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्या जनावरांवर होत असलेल्या उपचारावर शेतकरी वर्गात समाधान पहायला मिळते. कारण फोन केला की, डॉक्टर लगेच हजर होतात. ते तब्बल 100-150 कि.मी. प्रवास, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता व्यवसायामध्ये व्यावसायीकता न पाहता केवळ सेवा या उद्देशाने नाममात्र फी मध्ये काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य. याच सेवेतून अनेक दुग्ध व्यावसायिक शेतकर्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडवून तंचे जीवनमान उंचावण्यामध्ये डॉक्टरांचा मोलाचा वाटा म्हणावा लागेल.
डॉ.मोहिते गेली 10 वर्षे फलटणहून वाई तालुक्याचा पूर्व भाग व कोरेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक खेड्यापाड्यात व वस्तीवर आपल्या मोटार सायकलवरुन व्हीजीट देवून सातत्याने सेवा पुरवित असतात. शासकीय सेवेतील असणारा अनुभ व त्यांचे अनुपालन यामुळे डॉ.मोहिते यांचे पशुवैद्यकीय सेवेतील योगदान हे केवळ व्यवसायापुरते मर्यादित नसून त्यांच्या पेशातील असणारा डॉक्टर व डॉक्टर पदाच्या आत असणारं माणूसकीचं व मुक्या जनावरांच्या व्यथा जाणून घेण्याच कसब हे डॉक्टरांना मिळालेली ईश्वरीय देणगीच म्हणावी लागेल. पशुवैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार नेहमी असतो. वाई व फलटण तालुक्यात त्यांनी स्वत:चे वेगळे व्यक्तीमत्त्व निर्माण केले आहे.
डॉ.मोहिते शेतकार्यांशी चर्चा करताना नेहमी म्हणतात, ‘मला स्वर्ग नको, स्वर्गाचे राज्य नको पण मनुष्य जन्मानंतर जर पुर्नजन्म असेल तर पुढील जन्म हा आजारी व मुक्या जनावरांची सेवा सुश्रुषा करण्यासाठी मिळो’.
डॉक्टरसाहेब आज आपला वाढदिवस, त्यानिमित्त आपल्या या भूतदयेला मानाचा मुजरा.
– श्रीकांत माळवे, सामाजिक कार्यकर्ते, फलटण.