टपाल तिकिटांवर आता वैयक्तिक फोटो; टपाल विभागाचा ‘माय स्टॅम्प’ उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.१३ : पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा छंद जोपासणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. यासाठी टपाल तिकीटप्रेमींना नामी संधी टपाल विभागाने “माय स्टॅम्प’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या स्वतःला टपाल तिकिटावर पाहता येणार आहे. हा एक वैयक्तिक पोस्टल स्टॅम्प असणार असून, टपाल तिकीटप्रेमींना संग्रहणीय आणि आवडत्या व्यक्तींना भेटवस्तू पाठविताना उपयोगी येणार आहे. 

ऐतिहासिकदृष्ट्या टपाल तिकिटाची सुरवात एक कागदाचा तुकडा त्याच्या चेहऱ्यावरील मूल्याच्या टपाल सेवेसाठी प्रीपेमेंटचे एक टोकन म्हणून वापरला जात होता. टपाल तिकिटे ही देशाच्या प्रतिमेचे प्रतिनिधित्व करतात. टपाल तिकिटाच्या माध्यमातून प्रत्येक अभ्यागतांना आपल्या भव्य देशाच्या समृद्ध, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संपत्तीचा शोध घेता येतो, अशी टपाल तिकिटे वैभवशाली व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतात. मात्र, आता सातारा टपाल विभाग “माय स्टॅम्प’ उपक्रम राबविणार असून, सद्य:स्थितीत सातारा व पाचगणी टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एक फोटो, फॉर्म, ओळखपत्र आणि 300 रुपयांची पूर्तता केल्यावर ग्राहकांना 12 स्टॅम्प’च्या प्रती मिळणार असल्याची माहिती टपाल विभागाने दिली. 

पर्यटनस्थळे, लोगोंची छपाई होणार : वैयक्तिक टपाल तिकीट बनविताना टपालाच्या निवडलेल्या टेम्पलेट शीटवर स्वत:चे छायाचित्र, संस्थांचे लोगो किंवा कलाकृती, वारसा इमारती, प्रसिद्ध पर्यटनस्थळे, ऐतिहासिक शहरे, वन्यजीव, इतर प्राणी व पक्षी इत्यादींची प्रतिमा छपाई करून वैयक्तिककृत केले जाणार असल्याची माहिती टपाल विभागाच्या वरिष्ठ अधीक्षक अपराजिता म्रिधा यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!