दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहरामध्ये सालाबादप्रमाणे सन २०२३ मध्येही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवास नगर परिषदेची स्टेज/मंडप उभारण्यासाठी परवानगी घेण्यासाठी नगर परिषदेकडे समक्ष अर्ज सादर करावे लागत होते. त्यानुसार ‘ऑफलाईन’ पद्धतीने परवानगी देण्यात येत होती. मात्र, सन २०२३ मध्ये फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत डिजिटल स्कॅनर (बारकोड) द्वारे स्टेज/मंडप परवाना ऑनलाईन पद्धतीने मंडळांना घेता येणार आहे. तसेच हा परवाना विनाशुल्क प्राप्त होणार आहे, अशी माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी दिली आहे.
स्टेज/मंडप परवाना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देताना ऑनलाईन माहिती भरण्यासाठी आवश्यक तो ‘क्यूआर कोड’ उपलब्ध केलेला आहे. या पद्धतीने घेतलेला परवाना मंडळांना श्री गणेश मंडळांनी सादर केलेल्या ई-मेल द्वारे प्राप्त होणार आहे. तसेच हा परवाना फलटण शहर पोलिसांकडेही ई-मेलने जाणार आहे. ऑनलाईनला काही अडचण आल्यास ऑफलाईनद्वारेही समक्ष परवाना मिळणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.
- ऑनलाईन स्टेज / मंडप परवाना प्राप्त करून घेण्याचा आवश्यक स्कॅनर वरीलप्रमाणे आहे.
१. फलटण नगर परिषदेने दिलेला वरील ‘क्यूआर कोड’ स्कॅनरच्या सहाय्याने स्कॅन करावा.
२. स्कॅन केल्यानंतर स्टेज/मंउप परवाना मिळणेकामी अर्ज उपलब्ध होईल.
३. उपलब्ध अर्जाची प्रिंट काढून माहिती भरून घ्यावी.
४. सदर अर्जामध्ये उपलब्ध असलेल्या गुगल फॉर्म लिंक तसेच त्यांचा ‘क्यूआर कोड’च्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने माहिती भरून अर्जात नमूद असलेली कागदपत्रे, माहिती भरलेला मागणी अर्ज, अर्जदार यांच्या आधारकार्डची छायांकित प्रत तसेच ज्या ठिकाणी मंडप उभारण्यात येणार आहे, त्या ठिकाणचा कच्चा नकाशा व ज्या ठिकाणी मंडप/स्टेज उभारण्यात येणार आहे, त्या ठिकाणचा फोटो अपलोड करावा.
५. गुगल फॉर्ममध्ये दर्शविलेली माहिती भरणे अनिवार्य आहे.
६. अर्ज प्राप्त होताच ४८ तासाच्या आत अर्जाची छाननी करून सदरची स्टेज/मंडप परवानगी आपण नोंदणी केलेल्या ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात येईल.