स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२२: व्हिसा बंदीवर सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजन (पीआयओ) कार्डधारकांना व्हिसा मंजूर करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की या व्यतिरिक्त परदेशी विद्यार्थी आणि व्यावसायिकांनाही भारत भेटीसाठी व्हिसा देण्यात येणार आहे. तसेच, सरकारने पर्यटकांच्या व्हिसावरील बंदी कायम ठेवली आहे.
गृह मंत्रालयाने (एमएचए) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरकारने व्हिसा आणि प्रवासावरील निर्बंधामध्ये क्रमवारीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत परदेशी नागरिक भारतात येऊ शकतील आणि भारतीय नागरिक देशाबाहेर जाऊ शकतील. व्यवसाय, परिषद, रोजगार, अभ्यास, संशोधन आणि उपचारांसाठी व्हिसा देण्यात येणार आहे. सर्व प्रवाश्यांना आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करावे लागणार आहे.
परदेशी लोक वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करू शकतील
गृहमंत्रालयाच्या ताज्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक व्हिसा, पर्यटक व्हिसा आणि वैद्यकीय व्हिसांवितिरिक्त सर्व प्रकारचे उपलब्ध व्हिसा त्वरित प्रभावाने पूर्ववत करण्यात आले आहेत. उपचारांसाठी भारतात येणार्या परदेशी नागरिकांना अटेंडेटसह वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.
हवाई आणि समुद्री मार्गाने येऊ शकतील लोक
ज्या कॅटेगिरीला व्हिजा निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे, त्यानुसार लोक हवाई आणि समुद्री रस्त्याने भारतात येऊ शकतील. सरकारने परदेशींना देशात प्रवेश देण्यासाठी निवडक विमानतळ आणि इमिग्रेशन चेक पोस्टला परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामध्ये वंदे भारत मिशन, एअर ट्रान्सपोर्ट बबल एरेंजमेंट किंवा शासनाने मंजूर केलेली नॉन शेड्यूल कमर्शियल फ्लाइटचाही समावेश करण्यात आलेला आहे.
सरकारने 23 मार्चला इंटरनॅशनल फ्लाइट्स बॅन केल्या होत्या
कोरोना व्हायरसमुळे भारताने 23 मार्चला आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवर प्रतिबंध लावला होता. दरम्यान 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली. कोरोनादरम्यान अडकलेल्या भारतीयांच्या परतीसाठी वंदे भारत मिशन अंतर्गत विशेष उड्डाणे चालवण्यात आली होती. त्याचबरोबर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी नौदलाची जहाजेही तैनात केली गेली. सरकारी वंदे भारत मिशनअंतर्गत कोट्यवधी भारतीय नागरिकांना सात टप्प्यात 50 हून अधिक देशांमधून परत आणले गेले आहे.