संभाव्य टंचाई रोखण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ एप्रिल २०२३ । अमरावती । उन्हाळा, तसेच अल निनो प्रभावाचा विचार करता भविष्यात टंचाईसदृश्य स्थिती निर्माण होवू नये यासाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांनी येथे दिले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक दुरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्तांनी घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, उन्हाळ्यातील संभाव्य टंचाईचे निवारण करतानाच, अल निनो प्रभावाचा विचार करता पर्जन्यमान कमी झाल्यास टंचाई उद्भवू नये यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजन करून सुसज्ज राहावे. दुष्काळासंबंधित यंत्रणांच्या नियमित बैठका घ्याव्यात. जुलै-ऑगस्ट महिन्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करावा. विहीर अधिग्रहण, टँकर आदी बाबींचा आवश्यकतेनुसार समावेश करावा.

मनरेगाअंतर्गत अधिकाधिक कामे राबवावीत. खारपाणपट्ट्यातील पेयजल पुरवठ्याचे नियोजन करावे. धरणातील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन संभाव्य टंचाई उपाययोजनांचे नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. बैठकीला सर्व जिल्हाधिकारी व उपायुक्त गजेंद्र बावणे, श्यामकांत म्हस्के यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!