दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२३ । मुंबई । कर्नाटकमध्ये झालेल्या पराभवानंतरही भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशातील विजयावर भाष्य केलं. तसेच, आम्ही महापालिकेच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालो तरी, काहींना वाटतं आता देशात सत्ताबदल होईल. मात्र, कर्नाटकमधील भाजपला मिळालेली मतं हे टक्केवारीच्या तुलनेत कमी झालेली नाहीत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या निकालांचं विश्लेषण करताना भाजपची बाजू मांडली. आता, फडणवीसांच्या विश्लेषणात्मक प्रतिक्रियेवरुन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी टोला लगावला आहे.
भारतीय जनता पार्टीचा किंवा जनसंघाचा इतिहास पाहिला तर अनेक वर्ष अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून येत नव्हत्या. किंबहुना आता जरी साउथ इंडियामधील राज्यांमध्ये पाहिलं तरी तिथेही भारतीय जनता पार्टीला फारसा प्रतिसाद मिळत नाही, मग अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पार्सल परत पाठवले म्हणायचं का? असे म्हणत एकनाथ खडसेंनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. फडणवीसांनी कर्नाटक निवडणुकींच्या प्रचारावेळी राष्ट्रवादीचं पार्सल महाराष्ट्रात पाठवा, असे म्हणत टीका केली होती.
शेवटी कोणताही राजकीय पक्ष प्रयत्न करतच असतो, भारतीय जनता पार्टीचे अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेल्याचे शेकडो उदाहरणे आहेत. भारतीय जनता पार्टीची आजमित्तीस खूप नाजूक परिस्थिती झालेली आहे, गिरा तो भी टांग उपर अशा स्वरूपाचे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य दिसत आहे, असा टोलाही खडसेंनी यावेळी लावला. फडणवीसांनी कर्नाटक निवडणुकांचे विश्लेषण करताना भाजपची बाजू आणि मिळालेल्या मतांची टक्केवारी सांगितली होती. त्यावरुन, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर बोचरी टीका केली.
कर्नाटक मध्ये काँग्रेसला यश मिळालं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्ष आहेत त्यांना यश मिळाले. म्हणजेज, भाजपच्या विरोधी पक्षांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे, देशभरामध्ये विरोधी पक्ष एकत्र राहिला तर बऱ्यापैकी यश मिळू शकेल, हा विश्वास वाढत आहे, आता दहा वर्षभरामध्ये आपण जे चित्र देशात पाहिलं, यापेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको, असेही खडसेंनी म्हटलं.
१७ तारखेला राष्ट्रवादीची बैठक
कर्नाटकच्या विजयानंतर महाविकास आघाडीचे मनोबल वाढलेले आहे. त्यामुळे,
भावी कालखंडातील लोकसभा या एकत्र लढाव्यात याविषयी आज होत असलेल्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. १७ तारखेलाही राष्ट्रवादीची बैठक आहे, त्या बैठकीच्या अनुषंगाने ही या बैठकीत चर्चा होईल, आणि १७ तारखेच्या बैठकीला मी उपस्थित राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले