दैदिप्यमान इतिहासाकडे दुर्लक्ष
स्थैर्य, सातारा, दि. ०९ (विजय मांडके) : देशातील मिदनापुर , बलिया व पुर्वीचा सातारा या तीन जिल्ह्यात इंग्रजांच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिसरकार स्थापन केले होते. स्मृतीशेष पंतप्रधान नरसिंह राव यांनी जाहीर केलेली सरकारकडे मिदनापूर , बलिया याठिकाणी सुसज्ज पध्दतीने उभी राहिली. मात्र सातारा येथील स्मारक उभे करण्याबाबत महाराष्ट्र शासन , जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी हे उदासीन असल्याचे दिसून येत आहे. काही स्वातंत्र्य सैनिकांच्या पुढाकाराने पाठपुरावा झाल्याने एक स्तंभ उभारण्यात आला आहे. बाकी उदासीनताच दिसत आहे. अयोध्येत राममंदिर बांधकाम सुरू मात्र प्रतिसरकार सन्मानार्थ सातारला स्मारक उभारणीबाबत मात्र सगळीकडे उदासीनता.
इंग्रज सरकारला देशाबाहेर घालवून देण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपले रक्त सांडले. कारावास भोगला. देशातील मिदनापूर , बलीया आणि सातारा या तीन जिल्ह्यांत प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते. या तीन जिल्ह्यांत तत्कालीन पंतप्रधान स्मृतीशेष नरसिंह राव यांनी प्रतिसरकार मधील सैनिकांच्या समानार्थ भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली आणि त्यासाठी काही रक्कमही जाहीर केली. मिदनापूर आणि बालिया या जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारची भव्य स्मारके उभी राहिली. मात्र अद्यापही सातारा जिल्ह्यातील अशा प्रकारचे स्मारक उभे राहू शकले नाही ही खेदाची नव्हे तर संतापजनक बाब आहे . सातारा शहरात नवीन प्रशासकीय इमारतीच्या शेजारी प्रतिसरकारच्या चळवळीचे स्मारक सध्या महत्प्रयासाने उभे करण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत परंतु जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर त्यांना म्हणावा असा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही असेच म्हणावे लागेल.
पुर्वीच्या सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्य चळवळीचा दैदिप्यमान असा इतिहास आहे. (आताचा सातारा व सांगली जिल्हा). परंतु तो इतिहास पुसून टाकण्याचे काम काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक करीत आहेत. विशेष म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार चळवळ सातारा जिल्ह्यात झाली होती. हे प्रतिसरकार बालिया व मिदनापूर येथील प्रतिसरकारच्या तुलनेत अधिक काळ चालले होते. स्वातंत्र्य दिल्याचे घोषित केले तरीही प्रतिसरकार काही गावातून सुरू होते अशी स्थिती असलेल्या सातारा जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी हे स्मारक उभे राहिले जात नाही हे वास्तव आहे .
तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी १९९१ साली मिदनापूर , बलिया व सातारा जिल्ह्यात अशा प्रकारची स्मारके व त्यासाठी काही कोटी निधी मंजूर केला. मिदनापूर व बलिया या ठिकाणी अशा प्रकारची भव्य स्मारके उभी राहिली. सातारा येथे तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व त्यानंतर स्मृतीशेष अभयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या स्मारकासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठका झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पुढे काहीच हालचाल झाली नाही
अशा प्रकारचे स्मारक व्हावे यासाठी खटाव तालुक्यातील जाखणगाव येथील स्वातंत्र्यसैनिक खाशाबा शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्याच वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर महाबळेश्वरकर यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी हे त्यादरम्यानच सातारा येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनीही या आंदोलनस्थळी भेट दिली. खाशाबा शिंदे यांना त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांची बैठक घेऊन आपण पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असे सांगून उपोषण स्थगित करण्यात आले. त्यानंतर क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पुढाकाराने सातारच्या शासकीय विश्रामधाम येथे जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची एक व्यापक बैठक झाली. त्यात या संदर्भात आंदोलन करण्याचे निश्चित झाले त्यामुळे पुन्हा एकदा या स्मारकाच्या उभारणीसाठी लोकांकडून व स्वातंत्र्य सैनिकांकडून गती मिळाली. त्याच दरम्यान या स्मारकासाठी जागा सरकारने उपलब्ध करून दिली होती त्यात त्यावेळी काही बदल होऊन आता फक्त अडीच एकर जागा या स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व तशी नोंदही करण्यात आलेली आहे. बलीया व मिदनापूर येथील स्मारके दहा एकर जागेत सुसज्ज पध्दतीने उभी राहिली आहेत.
सातारचे हे प्रतिसरकार चे स्मारक व्हावे यासाठी स्वातंत्र्य सेनानी व प्रतिसरकार मधील एका गटाचे प्रमुख सोपानराव घोरपडे यांच्या पुढाकाराने सध्या स्वातंत्र्यसैनिक पतंगराव फाळके सामाजिक कार्यकर्ते अस्लम तडसरकर , विजय निकम , शिवाजी राऊत ही मंडळी विशेष प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे या मंडळींनी सातारचे माजी जिल्हाधिकारी सुबराव पाटील, डॉ. एन. रामास्वामी यांच्याबरोबर अनेक बैठका घेऊन पाठपुरावा करून हा प्रश्न जरा पुढे सरकवला. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रश्नात लक्ष लागले होते. त्यावेळी पंजाबराव चव्हाण यांच्या पुढाकाराने हे कार्यकर्ते दिल्लीला गेले होते.
डॉ. एन. रामास्वामी यांनी मात्र पुढाकार घेऊन काही रक्कम या स्मारकासाठी स्वतःच्या अखत्यारित मंजूर केली आणि येथे शिल्प उभे केले. ज्या पद्धतीने मिदनापूर व बालिया येथे तिथल्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ही स्मारके उभी केली त्या तुलनेत सातारा येथील लोकप्रतिनिधी मात्र याबाबतीत नेहमीच उदासीन राहिले आहेत हे नक्की आणि त्यांच्या उदासीनतेमुळे हे स्मारक उभे राहत नाही हे वास्तव आहे. आताचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सुध्दा बैठक घेणार असल्याचे समजते. बघुया कधी घेतात ते बैठक.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारची चळवळही ही जाळपोळ किंवा घातपात करणारी अशी चळवळ नव्हती तर ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेच शिवाय न्यायदान मंडळ , पंचायत स्थापन करून त्यांनी शेतकऱ्यांना ,स्त्रीयांना , गावकऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने काम केले. जो कोणी सावकार गरिबाला नडेल त्याला या न्यायदान मंडळात त्याची सुनावणी होऊन त्याला शिक्षा दिली जात असे. प्रतिसरकारचा दैदिप्यमान इतिहास नव्या पिढीपुढे मांडणे गरजेचे असताना या शहिदांची व हुतात्म्यांची आठवण जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी न ठेवता चालवलेली उदासीनता याला काय म्हणावे?
सातारा येथील या प्रतिसरकारच्या चळवळीच्या स्मारकाच्या जाग्यावर सध्या शिल्प उभे करण्यात आले आहे व सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार नेमके कोणत्या भागात होते त्याचा नकाशा हि त्या शिल्पावरील कोनशिलेवर काढण्यात आलेला आहे. मात्र सध्याची त्या स्मारकाच्या जागेची अवस्था बघितली तर गवताचे साम्राज्य येथे उभे राहिलेले आहे व या स्मारकाची दुर्दशा मात्र तेथे दिसून येत आहे जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार . तिकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करून राम मंदिर उभारणी सुद्धा सुरू झाली आहे मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले , रक्त सांडले , कारावास भोगला त्यांच्या चळवळीच्या स्मारकासाठी मात्र जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत याला काय म्हणावे ? प्रतिसरकारच्या चळवळीचा दैदिप्यमान इतिहास आपण जपणार आहोत की नाही हीच शंका येऊ लागली आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या मुलखात प्रतिसरकारच्या स्मारकाबाबत एवढे दुर्लक्ष का होते हे कळत नाही. प्रतिसरकारचा इतिहास नव्या पिढीपुढे जाऊ नये असे वाटत आहे का?
विजय मांडके, सातारा. ९८२२६५३५५८