कुलदैवत जोतिबा देवाच्या यात्रेसाठी सर्व जातीधर्मातील लोकांची वर्गणी घ्यावी; वाखरी ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२३ | फलटण |
वाखरी (ता. फलटण) गावच्या ग्रामस्थांची कुलदैवत जोतिबा देवाच्या यात्रेसाठी वर्गणी घ्यावी व तसे आदेश वाखरी गावच्या यात्रा कमिटीस द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे केली आहे.

वाखरी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाखरी गावामध्ये नवीनच गेल्या वर्षीपासून जोतिबा देवाची यात्रा भरत आहे. या यात्रेमध्ये ग्रामस्थांची वर्गण घेतली जात नाही. जोतिबा यात्रेसाठी गावातील सर्व जातीधर्मातील लोकांची वर्गणी घेतली जावी म्हणून जोतिबा देवस्थान यात्रा कमिटीस बोलावून वर्गणी घेण्याचे आदेश द्यावेत, असे म्हटले आहे.

वाखरी गावामधील ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा १०० वर्षांपासून भरत होती. मात्र, सध्या गावात राजकीय द्वेषातून दोन गटामध्ये असलेल्या भांडणांमुळे व समझोता न झाल्यामुळे प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भैरवनाथ देवाच्या यात्रेवर बंदी घातली आहे. तसेच प्रशासनाने यात्रेत १४४ कलम लागू केले आहे. मात्र, जोतिबा देवाच्या यात्रेसाठी ग्रामस्थांची वर्गणी घेण्यात यावी. जोतिबा देवाच्या यात्रेसाठी वर्गणी घेतली तर यात्रेत कुठलीही अडचण येणार नाही; परंतु वर्गणी न घेता जोतिबा यात्रेस व छबिन्यास परवानगी दिली तर जातीयवाद निर्माण होईल व गावामध्ये आपापसात भांडणे होतील. तसेच गावात शांततेचा भंग होईल. प्रशासनाने वर्गणीच्या वादावरून गावात शांततेचा भंग होऊ नये म्हणून ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेस बंदी घातलेली आहे.

प्रशासनाने सर्व ग्रामस्थांना समान न्याय द्यावा, न्याय नाही दिला तर वाद होण्याची दाट शक्यता आहे. आमच्या सर्व गावातील देवकार्य व छबिना काढण्यास सर्वांनाच परवानगी द्यावी. कुठलाही दुजाभाव करू नये. केलेस गावात धनगर, मराठा, मागासवर्गीय यांच्यात भांडणतंटा होऊन जातीय वादावादी होण्याची शक्यता आहे. यास्तव प्रशासनाने सर्व ग्रामस्थांना समान न्याय देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकार्‍यांना केली आहे.


Back to top button
Don`t copy text!