मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची पवारांनी घेतली आयुक्तांकडून माहिती


 

स्थैर्य, मुंबई, दि.११: सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, कंगना रणौत प्रकरण आणि राजकीय नेत्यांना आलेले धमकीचे फोन, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी चर्चा केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या २० मिनिटांच्या या चर्चेत पवार यांनी सर्व प्रकरणाची माहिती घेतल्याचे समजते.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण आणि कंगना रणौत प्रकरण यासोबत राजकीय नेत्यांना आलेले धमकीचे फोन, या सर्व घडामोडींनी महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. या सर्व प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी चर्चा केली. कंगना प्रकरणाच्या माध्यमातून सोशल मीडियावर घडत असलेल्या घडामोडी, शिवसेना, भाजपा या राजकीय पक्षांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यावरून कायदा-सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण झाला आहे, या संदभार्तील माहिती आयुक्तांनी पवारांना दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

याशिवाय कंगना रणौत विषयावरून भाजपाकडून विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. यात कंगनाच्या मुंबई विरोधातील विधानाचे जाहीर समर्थन केले जाते, यावरही मुंबई पोलीस लक्ष देऊन असल्याची माहिती आयुक्तांनी पवारांना दिली असल्याचे कळते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!