‘दयनीय जागरूकता’ तथा ‘दुर्दैवी जनता’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ सप्टेंबर २०२३ | फलटण |

‘गणपती बाप्पा आले रे आणि विराजमान झाले रे,
पारंपरिक थाटातच त्यांचे स्वागत करा रे,
नको तो डीजे, नको त्याचा विपर्यास,
विचार करा जरा आत्ताच, नाही थांबलात तर सगळ्यांनाच होईल त्रास!

परवाच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे थाटामाटात आगमन झाले. भव्य मिरवणुका, हीप हॉप गाणी, नाचणे-थिरकणे आणि बेधूंद झालेली तरुण मंडळी आणि याचबरोबर आभाळाला भिडलेले डीजेंचे आवाज.

माननीय लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव १८९४ साली सुरू केला. इंग्रजांच्या विरूद्ध लढण्यासाठी भारतीयांना एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचा त्यांचा उद्देश होता.

पूर्वीचे गणेशोत्सव पण तसेच असायचे. सामाजिक बांधिलकी, प्रबोधन आणि सामाजिक उपक्रम यांची पूरेपूर लयलूट व्हायची. त्या उत्सवाला एक शान असायची. एकत्र येऊन काहीतरी सकारात्मक घडामोड व्हायची. तीनही पिढ्यांचा सहभाग त्यामध्ये असायचा.

पण… यावर्षीच्या मिरवणुकी आणि त्याबरोबर डीजेचा धिंगाणा पाहिल्यावर आपण काय आणि कशासाठी हे सगळं करतो आहे? कशाचेच भान आपल्याला राहिलेले नाही? ही तरुण पिढी नक्की कुठे चालली आहे? लोकमान्य टिळकांनी नक्की गणेशोत्सव का आणि कशासाठी सुरू केला होता, अशा बर्‍याच प्रश्नांचे काहूर मनात माजते, यात काही शंकाच नाही!

सर्वप्रथम आपण या डीजेच्या डेसिबलचे दुष्परिणाम बघूयात :

  • आवाजाचे डेसिबल ७० च्या पुढे असल्यास माणसाला नक्कीच हानी पोहोचते. डीजेचा आवाज हा कमीतकमी १०० डेसिबल किंवा काहीवेळा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे १२० डेसिबल इतकाही असतो. त्यामुळे बहिरेपणा, हाय ब्लडप्रेशर, डोके दुखणे किंबहुना हार्ट अटॅक आणि अकस्मात मृत्यूही येऊ शकतो.
  • लहान लहान कोवळ्या वयातील मुले जेव्हा त्या डीजेसमोर तासन्तास उभे राहून नाचताना दिसतात तेव्हा यांचे पुढे काय होणार? असे नेहमी वाटत राहते.
  • डीजेच्या आवाजाने हादरे बसून त्या वायब्रेशनमुळे छातीत धडकी भरणे, धडधड वाढणे, डोके कलकलणे आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे असे बरेच आजार होऊ शकतात.
  • जास्त वेळ त्या डीजेची कंपन राहिल्यामुळे बिल्डिंगच्या काचा फुटणे, बिल्डिंगच्या भिंतींना तडे जाणे आणि मग ती कोसळणे हेही प्रकार घडले आहेत.

आता असे असताना हे डीजेचे प्रकरण चालू ठेवायचे की बंद करायचे? हा विचार सूज्ञ माणसाने नक्कीच करावा, असे मला वाटते. (सूज्ञ माणसास सांगणे नं लगे).

आता खरंच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. ‘एक गाव, एक गणपती’ बसवल्यास खूप गोष्टी चांगल्या घडतील. टिळकांचा जो मूळ उद्देश होता की, समाजाचे एकत्रीकरण झाले पाहिजे, ते नक्कीच साध्य होईल. इर्षा, द्वेष, चढाओढ ह्या भावना नष्ट होऊन सामाजिक बांधिलकी वाढेल, जो काही निधी गोळा होईल त्याने गावाचा विकास करता येईल. गरजूंना मदत करता येईल. आनंदी, उत्साही आणि सकारात्मक एकजूट होईल, की ज्यामुळे समाजाचे भलेच होईल.

आता आपल्या गणपती बाप्पाची काही वैशिष्ठ्ये बघूयात…

  • गणपती बाप्पाचे डोके मोठे असते, कारण मोठा आणि चांगला विचार डोक्यात यावा.
  • डोळे छोटे असतात, कारण आपल्या कामामध्ये पूर्ण लक्ष देण्यासाठी आणि कुठेही विचलित होऊ नये म्हणून.
  • सोंड ही आपल्यातील उच्च क्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे प्रतीक आहे.
  • मोठे पोट हे आयुष्यातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी पचवण्यासाठी दिले आहे.
  • मोठे कान सगळ्यांचे ऐकण्यासाठी आणि लहान तोंड कमी बोलण्यासाठी दिले आहे.
  • मोदक हे आपल्या साधनेचे फळ आहे.

थोडक्यात ‘गणपती बाप्पा’ हे दैवत आपल्यातील वाईट गोष्टी बाहेर काढण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी अंगिकारण्यासाठी, आपल्याकडून चांगले कर्म घडण्यासाठी आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन आपल्यातील उच्च क्षमता वाढविण्यासाठी आहे. मग आपण हा उत्सव कसा साजरा करायला पाहिजे, हे आपणच ठरवावे.

मिरवणूक जरूर काढावी, पण त्यात ढोलताशे असावेत, तालबद्ध लेझिम असावे, लयबद्ध सांस्कृतिक कला असावी (सर्वांनी याचेच अनुकरण करावे, हीच सदिच्छा). ना की डीजेंवर अश्लील नाच आणि बिभत्स हालचाली. आपल्या थोर आणि दिग्गज मंडळींनी घालून दिलेले काही नियम आपण पाळायला नकोत का? गणपती बाप्पा आल्यानंतर एक चैतन्य निर्माण होते. ते चांगल्या रीतीने जोपासायला नको का?

तर प्रियजनहो, गणपती बाप्पा आहेत आपल्या सर्वांचेच विघ्नहर्ता, नका करू विपर्यास या उत्सवाचा नाहीतर होईल घात आपल्याच सर्वांचा!

ही माहिती जोशी हॉस्पिटल प्रा.लि., फलटणचे अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रसाद जोशी जनहितार्थ दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!