पाटण: मरळी येथील डोंगरी महोत्सवात चोख पोलीस बंदोबस्त; एसटीच्या जादा फेऱ्या


पाटण तालुक्यातील मरळी येथे २ ते ६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या ‘डोंगरी महोत्सवा’साठी चोख पोलीस बंदोबस्त आणि एसटीच्या जादा गाड्या सोडण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. ३० मार्च : पाटण तालुक्यातील मरळी येथे २ ते ६ एप्रिल दरम्यान ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव’ पार पडणार आहे. या महोत्सवासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस

जिल्हाधिकारी कार्यालयात या महोत्सवाच्या नियोजनाबाबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपस्थित होत्या. महोत्सवात पाटण तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यांना हुल्लडबाजांकडून कोणताही त्रास होऊ नये यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाचे विशेष नियोजन

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने २ ते ६ एप्रिल या कालावधीत विशेष नियोजन केले आहे. मरळी कारखाना येथून नवा रस्ता परिसरातील प्रवाशांकरिता आणि नवा रस्ता ते मरळी कारखाना या मार्गावर दर ३० मिनिटांनी बसेस धावतील. तसेच पाटण-मरळी-ढेबेवाडी या मार्गावर दर ४५ मिनिटांनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

रात्री साडेदहा वाजता शेवटची बस

केळोली, पाडळोशी, जळव तारळे, सडावाघापूर तारळे, कोयना, जिंती, सळवे, काळगाव, वाल्मिक, वनकुसवडे, कुसरुंड व चोरे या गावांतील प्रवाशांसाठी मरळी कारखाना येथून शेवटची बस रात्री साडेदहा वाजता सुटेल. याव्यतिरिक्त गोकुळ धरण, काहिर, हुंबरणे, पांढरपाणी, आटोली, मुरुड, घाटेवाडी, चाफोली, गोवारे आणि कुंभरगाव या गावांसाठीही परिवहन खात्यामार्फत विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

“महोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा. गर्दीचे आणि वाहतुकीचे व्यवस्थापन योग्य करावे. तसेच पोलिसांनी महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे,” अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!