
पर्यटन विभाग आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाटण येथे २ ते ६ एप्रिल दरम्यान ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यात साहसी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी असणार आहे.
स्थैर्य, पाटण, दि. ३० मार्च : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग, सातारा जिल्हा प्रशासन आणि पुणे विभागीय पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण येथे २ ते ६ एप्रिल या कालावधीत ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्यातील निसर्गसंपन्न पर्यटन स्थळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
पर्यटनाला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
या उपक्रमामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. या महोत्सवात नागरिक, शेतकरी, पर्यटक आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री देसाई यांनी केले आहे.
साहसी खेळ आणि मनोरंजन विश्वाची मांदियाळी
महोत्सवात २ एप्रिलला शाहिरी पोवाडा, ३ एप्रिलला भजनी मंडळ, ४ एप्रिलला ब्रास बँड पथकाचे सादरीकरण आणि ५ एप्रिलला लावणी महोत्सव रंगणार आहे. यासोबतच बोटींग, घोडेस्वारी, पॅराग्लायडिंग, उंट सफारी आणि जेटस्की यांसारख्या साहसी खेळांचा थरार पर्यटकांना अनुभवता येईल. संस्कृती बालगुडे, स्पृहा जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवाला हजेरी लावणार आहेत.
खाद्यजत्रा आणि स्थानिक उत्पादनांना व्यासपीठ
महोत्सवात महिला बचत गटांना हक्काचे दालन उपलब्ध करून दिले जाणार असून, हस्तकला आणि सातारी पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे प्रदर्शन हे मुख्य आकर्षण ठरणार आहे. तसेच कृषी प्रदर्शन, आनंदमेळा, शस्त्र प्रदर्शन आणि पशु-पक्षी प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.
“राज्याच्या पर्यटन धोरणाच्या अनुषंगाने ग्रामीण, साहसी आणि आरोग्य पर्यटनाला चालना देण्यासाठी अशा महोत्सवांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या उपक्रमामुळे स्थानिक कौशल्य, संस्कृती आणि पर्यटन संधी यांचा प्रभावी संगम साधला जाईल,” – संजय खंदारे, प्रधान सचिव (पर्यटन)
“या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना साहसी उपक्रमांसह स्थानिक संस्कृती, पाककला आणि नैसर्गिक सौंदर्याचा बहुआयामी अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे पाटण आणि सातारा जिल्ह्याची पर्यटन ओळख अधिक दृढ होईल,” डॉ. बी. एन. पाटील, संचालक, पर्यटन संचालनालय

