पाटण: ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सवा’चे शानदार उद्घाटन; पर्यटनासह संस्कृतीचा अनोखा संगम – शंभूराज देसाई


पाटण तालुक्यातील नाडे (मरळी) येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सवा’चे मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडले. या महोत्सवातून नागरिकांना पर्यटनासह विविध संस्कृतींचा अनुभव घेता येणार आहे.

 स्थैर्य, पाटण, दि. २ एप्रिल : डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देण्याच्या दृष्टीने मरळी (ता. पाटण) येथे आयोजित ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव’ अत्यंत महत्त्वाचा आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांना आता जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन

पाटण तालुक्यातील नाडे येथे २ ते ६ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सवा’चे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पंचायत समिती सभापती सविता पवार, उपसभापती विजय पवार, श्रीमती विजयादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवीराज देसाई, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

कृषी प्रदर्शन ते साहसी खेळ; महोत्सवातील आकर्षणे

या महोत्सवाच्या निमित्ताने डोंगरी भागातील नागरिकांना पर्यटनासोबतच राज्यातील विविध भागांतील खाद्यसंस्कृती आणि कला यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. शेतकरी बांधवांसाठी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, महिला बचत गटांचे आकर्षक स्टॉलही उभारण्यात आले आहेत. याशिवाय पर्यटकांना बोटिंग, पॅराग्लायडिंग, संगीत कारंजे, लेझर शो, तसेच घोडा व उंट सफारीचा आनंद लुटता येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि शिस्तीचे आवाहन

पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये शस्त्र प्रदर्शन, लावणी महोत्सव, पोवाडा सादरीकरण, मर्दानी खेळ, भजन-कीर्तन, ब्रास बँड पथक, आणि हिंदी-मराठी संगीताच्या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

“नागरिकांनी या पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचा आवर्जून लाभ घ्यावा. महोत्सवादरम्यान सर्वांनी शिस्तीचे काटेकोर पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी,” असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले.

विद्यार्थ्यांची लक्षवेधी प्रात्यक्षिके

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी अंगावर शहारे आणणारे ‘शौर्य गीत’ सादर केले. तसेच, उद्घाटन समारोपाप्रसंगी याच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘मर्दानी खेळांच्या’ चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.


Back to top button
Don`t copy text!