स्थैर्य, मुंबई, दि. १२ : शरद पवार यांनी मात्र पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत, असं विधान करत पार्थ यांच्या वक्तव्यांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे. पार्थ यांनी सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारलं असता शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही ते इनमॅच्युअर आहेत,” असं शरद पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सध्या चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे ‘जय श्रीराम’ म्हणत त्यांनी राम मंदिर निर्माणाला दिलेल्या शुभेच्छा.
राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला होता. मात्र शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी जय श्रीराम म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्यात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर पार्थ पवार यांनी राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहून ‘जय श्रीराम’चा जयघोष करणारं ट्वीट केलं.
शरद पवार यांच्या एवढ्या स्पष्ट भूमिकेनंतरही पार्थ पवार यांनी केलेल्या ट्वीटमुळे पार्थ पवार हे पक्ष आणि शरद पवार यांच्या विरोधी भूमिका का घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थची ही वैयक्तिक भूमिका आहे, असं म्हटलं.
“लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना दडपशाहीची इतकी सवय झाली आहे का की व्यक्तिस्वातंत्र्याचा विसर पडला आहे?” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
पण त्यामुळे पार्थ यांच्यासंदर्भातली चर्चा थांबली नाही. याच कारण म्हणजे पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळा विचार मांडण्याची पार्थ पवार यांची ही पहिलीच वेळ नव्हती.