दैनिक स्थैर्य | दि. २२ एप्रिल २०२४ | फलटण |
भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन फलटणमधील नागरिकांसाठी संगिनी फोरम, फलटणमार्फत पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईच्या उद्घाटनप्रसंगी श्री. अरविंद मेहता बोलत होते. सध्या तीव्र उन्हाळा आहे. नागरिकांसाठी पाणपोई सुरू होणे फार गरजेची गोष्ट होती, संगिनी फोरमने उमाजी नाईक चौक येथे मध्यवर्ती ठिकाणी पाणपोई सुरू करून एक स्तुत्य उपक्रम राबवल्याचे मेहता यांनी सांगितले.
पाणपोईचे उद्घाटन फलटणमधील ज्येष्ठ व्यापारी श्री. कांतीलाल कोठारी व ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंदभाई मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. मंगेशभाई दोशी, जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सविता दोशी, चंद्रप्रभू मंदिरचे विश्वस्त राजेंद्रभाई कोठारी, साप्ताहिक ‘आदेश’चे संपादक श्री. विशालभाई शहा, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक शिवलाल गावडे सर, संगिनी फोरमच्या संस्थापक अध्यक्षा सौ. स्मिता भाभी शहा, जैन सोशल ग्रुपचे सचिव प्रीतमभाई शहा, उपाध्यक्ष श्रीपाल जैन, संगिनी फोरम अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, सचिव सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ. मनीषा घडीया, माजी अध्यक्षा सौ.नीना कोठारी, माजी सचिव पौर्णिमा शहा, जैन सोशल ग्रुप संचालक श्री. सचिन शहा, श्री. हर्षद गांधीव व बहुसंख्य संगिनी सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी संगिनी फोरमकडून सर्वांचा उचित सत्कार करण्यात आला. सौ. पूजा दोशी यांना लायन्स क्लब इंटरनॅशनलचा मानाचा ‘एमजेएफ’ सन्मान प्राप्त झाल्याबद्दल संगिनी फोरमकडून भेटवस्तू देऊन सौ. पूजा दोशी यांचा सत्कार करण्यात आला.
कोठारी परिवाराचे पाणपोईकरीता विशेष सहकार्य लाभल्याबद्दल संगिनी फोरमकडून कोठारी परिवारास धन्यवाद देण्यात आले.