सोमंथळी येथील श्री मारूती मंदिरात जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. २२ एप्रिल २०२४ | फलटण |
सोमंथळी, ता. फलटण येथील दक्षिणमुखी स्वयंभू श्री मारूती मंदिरात उद्या, दि. २३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अखंड विना पहाटे ४ ते ६, काकडा आरती सकाळी ८ ते ११, दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन, रात्री ११ वाजता हरिजागर, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अनेक संतमहात्मे यांचे प्रवचन, कीर्तन होऊन उत्सव साजरा होत आहे.

सोमंथळी येथील हे दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान मंदिर ‘जागृत देवस्थान’ म्हणून ओळखले जाते. या हनुमानाच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, माळशिरस, पंढरपूर, बारामती, माण, खटाव व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून तसेच दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. २०१० पासून प्रत्येक शनिवारी प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. ग्रामस्थांमार्फत फराळांचे वाटपही करण्यात येते. दर पौर्णिमेला श्रींच्या पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रम व महाप्रसादाचे नियोजन केले जाते.

यात्रेच्या अगोदर सात दिवस सप्ताह असतो. या दक्षिणमुखी मारूतीचा जन्म पौर्णिमेला झाला असल्याने दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे. ती ग्रामस्थांनी तसेच परंपरागत चालू ठेवली आहे. दि. २३ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ४ ते ६ हनुमान जन्मकाळनिमित्त स्थानिक भजनी मंडळांचा ‘संगीत भजन’ सोहळा, ६.१० वाजता गुलालपुष्पांची उधळण करीत हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम संपन्न होईल.

सकाळी ८ ते ९ यावेळी गावप्रदक्षिणा दिंडी मिरवणूक होईल. सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये ह.भ.प. पांडुरंग महाराज सोडमिसे, सोमंथळी यांचे काल्याचे किर्तन होईल. दुपारी ३ ते ६ कावडी काट्यांची मिरवणूक, रात्री ९ ते११ श्रींची छबिना मिरवणूक होणार आहे. तसेच त्यानंतर करमणूक कार्यक्रम.

शुक्रवार, दि. २४ रोजी सकाळी १० ते ३ पर्यंत लोकनाट्य तमाशा कार्यक्रम, दुपारी ४ ते ८ या वेळेत जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे.

या हनुमान जन्मोत्सवाचा लाभ फलटण तालुका व सोमंथळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन मारूती देवस्थान ट्रस्ट सोमंथळीचे अध्यक्ष संजय भगवान सोडमिसे व विश्वस्त कमिटीकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!