पंडित हृदयनाथ मंगेशकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


हृदयनाथांच्या बालपणीच दीनानाथांचे निधन (१९४२) झाल्याने त्यांना वडलांचा फारसा सहवास व प्रत्यक्ष तालीम मिळाली नाही; पण वंशपरंपरेने आलेला संगीतवारसा, शास्त्रीय संगीताची उस्ताद अमीरखाँ यांच्याकडून घेतलेली तालीम, आपल्या समकालीन संगीतकारांच्या स्वररचनांचा हृदयनाथांनी केलेला अभ्यास व स्वतंत्र प्रतिभा यांमुळे सुरुवातीपासूनच हृदयनाथांची एक वेगळी संगीतशैली आकारास आली.

त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ‘निसदिन बरसत नैन हमारे’ व ‘बरसे बूंदिया सावन की’ या भक्तिगीतांना स्वरसाज चढविला. ती गीते आजही रसिकप्रिय आहेत.

संगीतकार सलील चौधरी यांना गुरुस्थानी मानणाऱ्या हृदयनाथांना त्या वेळच्या बहुतेक सर्व महत्वाच्या संगीतकारांचा सहवास व काहींची मैत्री लाभली; त्यामुळे त्यांची मूळचीच वेगळी संगीतशैली अधिक विकसित व वैविध्यपूर्ण होत गेली.

हृदयनाथांच्या बहुसंख्य संगीतरचना या स्त्रीस्वरप्रधान आहेत व त्यांपैकी बहुसंख्य त्यांच्या गायिका भगिनी लता मंगेशकर व आशा भोसले यांनी गायलेल्या आहेत. याशिवाय त्यांनी किशोरी आमोणकर, अनुराधा पौडवाल, पद्मजा फेणाणी, ज्योत्स्ना हर्डीकर, राधा मंगेशकर आदी गायिकांना आणि सुरेश वाडकर, महेंद्र कपूर, अरुण दाते, रवींद्र साठे आदी गायकांना आपल्या संगीत दिग्दर्शनात गाण्याची संधी दिली. त्यांनी अनिल मोहिले, अरुण पौडवाल, अमर हळदीपूर अशा अनेक संगीत-संयोजकांना त्यांच्या गाण्यातील संगतीच्या वाद्यमेळाचे अर्थवाही संयोजन करण्यास मार्गदर्शन केले. हृदयनाथांनी त्यांच्या स्वत:च्या व इतर संगीतकारांच्या संगीतात गायलेली वेगवेगळ्या बाजांची व शैलीची कित्येक भावगीते, भक्तीगीते, चित्रपटगीते लोकप्रिय आहेत.

त्यांनी काही निवडक मराठी सिनेमांना चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग इ. संगीत दिले आणि हिंदी मध्ये धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले.

हृदयनाथांनी  संत ज्ञानेश्वर, मीराबाई, सूरदास, कबीर आदी संतकवींबरोबरच भा. रा. तांबे, गोविंदाग्रज, स्वा. सावरकर आदी स्वातंत्र्यपूर्व काळातील कवी तसेच आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, शांता शेळके, ना. धों. महानोर आदी स्वातंत्र्योत्तर आधुनिक कवी यांच्या विविध रचनांचा समावेश केला. या सर्वांच्या रचनांमधील वैविध्य व विभिन्न भाव समर्थतेने रसिकांपर्यंत पोहोचवले, हे त्यांच्या संगीत-कारकिर्दीतील मोठे यश व सुगम संगीतक्षेत्राला त्यांच्याकडून मिळालेले मोठे योगदान होय. अशा सर्व कवींच्या काव्यातील शब्दांपलीकडचे  भाव वेगळ्या सांगीतिक हाताळणीसह  व श्रुतिप्रधान संगीत रचनांमधून अभिव्यक्त करणे हे त्यांच्या संगीताचे मोठे वैशिष्ट्य आहे.

त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे ‘भावगंधर्व’ अशी करून देण्यात येते ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या आणि मराठी जगतात गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळे. सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत.स्वात्यंत्रवीर सावरकर हे तर त्यांचे दैवत होते त्यांच्या गाण्यांना अतिशय सुमधुर चाली दिल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्‌गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाऊन घेऊन अजरामर केले आहेत.

त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्यातरी त्यातही ते अनेक नवनवीन प्रयोग करतात. आपले वडील आणि संगीत नाटकांच्या जमान्यातले प्रख्यात गायक-नट मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या पदांचा वापर ते आपल्या संगीत रचनांमधे करतात.

त्यांच्या गाजलेल्या गाण्यांपैकी काही गाणी

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,चांदण्यात फिरताना,सूर मागू तुला मी कसा,तुज मागतो मी आता,भय इथले संपत नाही,सावर रे,दे मला गे चंद्रिके,

त्या फुलांच्या गंधकोषी,ॐ नमोजी आद्या,तिन्हीसांजा सखे मिळाल्या, हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जिवलगा, राहिले दूर घर माझे,सागरा प्राण तळमळला हृदयनाथ, मीना, उषा आणि लता मंगेशकर,जाईन विचारित रानफुला, वादलवारं सुटलं गो,नीज रे नीज शिवराया, कशी काळ नागिणी,नाही कशी म्हणू तुला,वेडांत मराठे वीर दौडले सात,ती येते आणिक जाते,हे श्यामसुंदर राजसा,

आणि अशी अजून कितीतरी अनेक.

त्यांनी  अनेक गवयांच्या मैफली ऐकल्या. एकदा पं. दिलीपचंद्र बेदी (पं. भास्करबुवांचे शिष्य) यांच्या मैफलीत ते तानपुऱ्याच्या साथीला बसले होते (बेदीजी हे त्यांचे गुरू पं. हुस्नलाल भगतराम यांचे गुरू) तेव्हा दिलीपचंद्रजी भूपश्री गात होते. त्याचं स्वरूप वेगळं होतं. त्या रागाचा प्रभाव त्यांच्यावर इतका पडला, की त्यातला त्यांना आवडलेला स्वरसमूह घेऊन त्यांनी चाल दिली ती ‘मालवून टाक दीप’ या गझलला.

एकदा ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांचं ‘व्यासपर्व’ पुस्तक वाचताना त्यांनी  वाचलं- ‘कृष्णाच्या अधरावर बासरी अशी विसावली, की जसा कोमल निषादावर शुद्ध धैवत विसावावा.’ हे वाचल्यावर असा राग कोणता, हे शोधताना त्यांना गोरखकल्याण सापडला आणि एक उत्कृष्ट चाल जन्मला आली- ‘मोगरा फुलला.’

हृदयनाथांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये लेकिन  या हिंदी चित्रपटाच्या संगीतदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार (१९९०), पं. भीमसेन जोशी व पं. जसराज यांच्या हस्ते ‘पंडित’ ही पदवी, शंकराचार्यांकडून ‘भावगंधर्व’ ही पदवी, शासनाकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार (२००९), सूरसिंगार हे पारितोषिक यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे सुगम संगीत क्षेत्रात कार्यरत असूनही पंडित ही पदवी मिळालेले ते सुगम संगीतातील पहिले कलाकार होत.

हृदयनाथांनी ‘हृदयेश आर्ट’ (मुंबई) ही संस्था स्थापन केली असून (२०११) दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंत व्यक्तीला हृदयनाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

पंडित हृदयनाथ मंगेशकरांना वाढदिवसाच्या  खूप खूप शुभेच्छा.

प्रसाद जोग.सांगली. ९४२२०४११५०


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!