३१ दिवस, ८ राज्ये अन् ५ हजार किमीचा प्रवास; देशातील पहिल्या ‘सायकल वारी’चा समारोप


संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आयोजित पंढरपूर ते घुमाण (पंजाब) या ५ हजार किमीच्या अध्यात्मिक सायकल वारीची बुधवारी सांगता झाली. ३१ दिवसांच्या या प्रवासाचा सविस्तर वृत्तांत वाचा.

स्थैर्य, पंढरपूर, दि. 06 डिसेंबर : भागवत धर्माचा पताका घेऊन महाराष्ट्र ते पंजाब असा तब्बल ५ हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या देशातील पहिल्या अध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीची बुधवारी (दि. ३) उत्साहात सांगता झाली. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या ३१ दिवसांच्या परतीच्या प्रवासाचा समारोप पंढरपुरातील नामदेव वाडा येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला.

३१ दिवस, ८ राज्ये आणि ५ हजार किमीचा प्रवास

भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी आणि समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने या वारीचे आयोजन करण्यात आले होते. हे वारीचे चौथे वर्ष होते. संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा आणि गुरुनानक देव यांच्या ५५६ व्या प्रकाश पर्वाचे औचित्य साधून २ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात आला. या वारीने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांतून प्रवास करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

सायकलस्वारांचा अद्वितीय उत्साह

भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या वारीत १०० सायकलस्वार आणि ५० भजनी मंडळी सहभागी झाली होती. कडाक्याची थंडी आणि लांबचा पल्ला असूनही वारकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सायकल वारीचा मुख्य समारोप २५ नोव्हेंबर रोजीच पंजाबमधील श्री क्षेत्र घुमाण येथे झाला होता, तर परतीची रथयात्रा बुधवारी पंढरपुरात दाखल झाली.

नामदेव वाड्यात भावपूर्ण सांगता

पंढरपुरातील संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या नामदेव वाड्यात या यात्रेची अधिकृत सांगता झाली. यावेळी संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज माऊली महाराज नामदास यांच्या हस्ते पादुकांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.

देह जावो अथवा राहो पांडुरंगीं दृढ भावो

या संत नामदेव महाराजांच्या अभंगाच्या गजरात वारीची सांगता करण्यात आली. यावेळी मुकुंद महाराज नामदास, मुरारी महाराज नामदास, पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर टेमघरे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, सचिव ॲड. विलास काटे, गणेश उंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!