दैनिक स्थैर्य | दि. 10 जुलै 2024 | फलटण | काल श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण येथे एका दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला होता. त्यानंतर पालखी पुढे बरड येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली परंतु पालखी सोहळ्याचे असणारी वाहने पुढे न सोडल्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा चालक, मालक, विश्वस्त व पोलीस प्रशासन यांच्यातील वाद समोर आला. त्यामुळे नाना पाटील चौक येथे सुमारे अर्धा तास पालखी थांबली होती. या सर्व गोष्टींमुळे पालखी सोहळ्याला उशीर झाला होता. यावेळी पोलिसांचा निषेध सुद्धा यावेळी पालखी सोहळा विश्वस्तांनी केला.
याबाबत पालखी सोहळा विश्वस्त यांच्यासोबत चर्चा केली असता; संपूर्ण पालखी सोहळा नियोजित रित्या मार्गस्थ होण्यासाठी प्रशासन व पालखी सोहळा यांच्यात बऱ्याच बैठका होत असतात. त्यानुसार फलटण मध्ये बैठका झाल्या होत्या. परंतु आयत्यावेळी पालखी सोहळ्याची वाहने पोलिसांनी पुढे न सोडल्याने संपूर्ण नियोजन कोलमडू शकले असते. यामुळे आम्हाला उतरून वाहने पुढे सोडावी लागली आहेत.
पालखी सोहळा सुनियोजित रित्या मार्गस्थ होण्यासाठी जेवढी जबाबदारी सरकारच्या अधिकाऱ्यांची आहे. तेवढीच जबाबदारी ही आमची सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही उतरून पालखी सोहळ्याची वाहने पुढे मार्गस्थ केली आहेत.