स्थैर्य, खटाव, दि. 8 : माण तालुक्यातील पळशी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण (एल.सी.बी) विभागाने माणगंगा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करून सुमारे 10 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त केल असून एल.सी.बी कडून सातत्याने माण व खटाव तालुक्यात होत असलेल्या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की सोमवारी पहाटे साडेतीनचे सुमारास पळशी येथे माणगंगेच्या नदीपात्रातून स्मशानभूमी शेजारी अवैध वाळू उपसा होत असल्याची खबर एलसीबी विभागाला मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी छापा टाकला.
यावेळी काही लोक बॅटर्यांच्या साह्याने ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये खोरे व पाटीच्या साह्याने वाळु भरत असल्याचे निदर्शनास येताच दबा धरून बसलेल्या गुन्हे विभागाच्या या पथकाने अचानकपणे त्या ठिकाणी धाड टाकून माण गंगा नदीपात्रात उभे असलेले दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. यावेळी ट्रॅक्टरमध्ये वाळू भरणारे इतर लोक अंधाराचा फायदा घेत बाजूच्या शेतात पळून गेले. यावेळी ट्रॅक्टर चालक हुसेन दिलावर मुलाणी (रा.पळशी) व सागर बाळू माने (रा. पळशी) या दोघांना या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडील वाहने जप्त करून त्यातील वाळूच्या मुद्देमालाचा पंचनामा करून वरील दोघांना व त्यांच्याकडील वाहनांना म्हसवड पोलिसांच्या ताब्यात देवून हे पथक पुन्हा सातारा येथे रवाना झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस नाईक शरद बेबले, नितीन गोंगवले, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, अजित कर्णे, विजय सावंत यांच्या पथकाने केली.