दैनिक स्थैर्य | दि. २२ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
निरगुडी (ता. फलटण) येथे झालेल्या भव्य कुस्ती आखाड्यात उपमहाराष्ट्र केसरी पै. संतोष दोरवड याने उपमहाराष्ट्र केसरी पै. समीर देसाई याला चितपट करून ‘निरगुडी केसरी २०२३’ चा किताब पटकावला.
निरगुडी (ता. फलटण) येथे झालेल्या कै. रघुनाथ तुकाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या ‘निरगुडी केसरी २०२३’ भव्य-दिव्य कुस्त्यांचे मैदान घेण्यात आले होते. यासाठी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे अशा विविध भागातून नामांकित पैलवान या कुस्ती आखाड्यासाठी उपस्थित होते. या आखाड्यात एकूण लहान-मोठ्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या. जवळपास शंभर कुस्त्यांचे नियोजन करण्यात आले होते. हे नियोजन फॉरेस्ट खात्याचे अधिकारी श्री. विलास रघुनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव श्री. ऋषिकेश विलास शिंदे यांनी आयोजित केले होते. यासाठी निरगुडीतील उद्योजक व सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.
प्रथमच निरगुडी गावांमध्ये भव्य दिव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय श्री. महाडिक, पोलिस निरीक्षक फलटण ग्रामीण श्री. पाटील यांची उपस्थिती होती. आखाड्याचे पूजन निरगुडी गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ज्या उद्योजकांनी कुस्त्या स्पॉन्सर्शिप केल्या होत्या, त्यांच्या हस्ते त्या कुस्त्या लावण्यात आल्या. यामध्ये श्री. विलास रघुनाथ शिंदे, के. बी. एक्सपोर्ट, शांतिकाका सराफ व निरगुडीतील उद्योजक यांनी कुस्त्या स्पॉन्सरशिप केल्या होत्या. शेवटची कुस्ती इनाम १ लाख रुपये पै. संतोष दोरवड (उपमहाराष्ट्र केसरी) विरुद्ध पै. समीर देसाई (उपमहाराष्ट्र केसरी) यांच्यामध्ये अतिशय अटीतटीची झाली. यामध्ये पैलवान संतोष दोरवड याने कुस्ती चितपट करून ‘निरगुडी केसरी २०२३’ चा मानकरी ठरला.
या मैदानासाठी निरगुडी व पंचक्रोशीतील सर्व कुस्तीप्रेमींची उपस्थिती होती.