दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
दरवर्षीप्रमाणे श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामी पादुका प्रचार दौरा, सज्जनगड मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी अर्थात चंपाषष्ठीपासून भोर, जिल्हा पुणे इथून सुरू झाला असून व सांगता अकलूज, जिल्हा सोलापूर येथे पूर्ण होत आहे. सोमवार, दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ ते ८.३० दरम्यान अकलूजहून समर्थ पादुकांचे प्रस्थान सज्जनगडकडे फलटणमार्गे होणार आहे.
सोमवार, दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९.३० ते १०.०० च्या दरम्यान फलटण येथे श्री समर्थ रामदास स्वामी महाराज पादुका काही वेळेसाठी प. पू. उपळेकर महाराज समाधी मंदिर येथे थांबणार आहेत. यावेळी भक्तांनी सहकुटूंब, मित्र, आप्तेष्टांसह सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी उपस्थित राहून तसेच श्री समर्थ झोळीत भिक्षा अर्पण करून श्री समर्थ सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री समर्थ पादुकांना दुपारच्या नैवेद्याच्या आधी सज्जनगड येथे पोहचणे आवश्यक असल्याने थोडा वेळच विसावा आहे, म्हणून वेळेचे बंधन पाळण्यात यावे, असे संयोजकांनी सांगितले आहे.