पद्मश्री बनबिहारी निंबकर हे भविष्याचा वेध घेणारे द्रष्टे व्यक्तिमत्व : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । फलटण । दिवंगत कृषीतज्ञ पद्मश्री बनबिहारी विष्णू निंबकर यांची राजकारण, समाजकारण याविषयी स्वतःची अशी ठाम मते होती. ते त्यावर कायम राहिले. फलटणच्या राजे घराण्याचे त्यांच्याशी एक जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांचे आणि शरदराव पवारांचे व त्यांच्या कुटुंबीयांशी असणारे नाते ते सर्वश्रुत आहे. निंबकर साहेबांच्या कार्याविषयी मी कायम पवार साहेबांकडून ऐकत असतो. निंबकर साहेबांनी निर्माण केलेल्या विविध संस्था आणि त्या संस्थांचा विस्तार व कार्य पाहता येणाऱ्या काळाची पावले ओळखून त्यानुसार भविष्याचा वेध घेणारे द्रष्ट व्यक्तिमत्व होते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे माजी सभापती, विद्यमान विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्था फलटण या संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे दिवंगत कृषीतज्ञ, पद्मश्री श्री.बनबिहारी विष्णू निंबकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या लोकत्तर कार्याचे स्मरण करण्यासाठी व त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आयोजित जाहीर कार्यक्रमांमध्ये बोलत होते.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलताना म्हणाले, “निंबकर साहेबांच्या तिन्ही कन्या डॉ.नंदिनी निंबकर, डॉ.मंजिरी निंबकर व डॉ.चंदा निंबकर या निंबकर साहेबांचा वारसा समर्थपणे चालवत आहे. आज अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण आहेत. नुकसानीचे पंचनामे अधिकारी खोटे करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला जगभर अनेक ठिकाणी वनवे लागत आहेत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. हे एक दुहेरी संकट आहे. सध्या हे शेती व्यवसाया समोरील मोठे आव्हान आहे. त्यासाठी जागतिक तापमान वाढ आपल्याला रोखणे आवश्यक आहे. पृथ्वीचे वाढणार तापमान हे अखिल मानव जातीसाठी धोक्याची घंटा आहे.या संकटाला सामोरे जात असताना जास्तीत जास्त वृक्षारोपण करून हे कार्य पद्मश्री बनबिहरी निंबकर यांच्या जीवन कार्याला समर्पित करणे हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे संघटन बांधून सर्वांनी एकत्रित या संकटांचा सामना करावा लागेल.

कार्यक्रमात डॉ. चंदा निंबकर यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून पद्मश्री बनबिहारी निंबकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत विविध फोटोंसह पद्मश्री बनबिहारी विष्णू निंबकर यांचा जीवनपट सर्वांसमोर मांडला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी केले.

कार्यक्रमाचा हेतू,उद्देश आणि गरज यावर मांडणी करत फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे यांच्यापासून ते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापर्यंत निंबकर परिवाराचा असणारा ऋणानुबंध व्यक्त करत त्यांनी निंबकर साहेबांच्या महाराष्ट्र शेळी मेंढी संशोधन व विकास संस्था, निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, निंबकर सीड्स प्रा. लि. संस्थांच्या माध्यमातून केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमामध्ये समुचित एनव्हारो टेक पुणे या संस्थेचे संचालक तथा ‘आरती’ संस्थेचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष डॉ.आनंद कर्वे यांनी पद्मश्री बी.व्ही निंबळकर यांचे शेती क्षेत्रातील बहुमोल कार्य याविषयावर प्रकाश टाकला. त्यांनी अतिशय मुद्देसूद मांडणी करून शेती क्षेत्रात संशोधन करत असताना निंबकर साहेबांना आलेले अनुभव, सरकारची संशोधनाबद्दलची उदासीनता, त्यांना करावा लागलेला संघर्ष आणि स्वतःच्या जडणघडणीमध्ये त्यांच्याकडून मिळालेलं बाळकडू व विविध क्षेत्रात संशोधन कार्य करताना झालेली मदत याविषयी विस्तृत मांडणी केली.

यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी श्री.बनबिहारी निंबकर यांचे पशुसंवर्धन क्षेत्रातील कार्य यावर आपली मांडणी केली. ते बोलताना म्हणाले,”निंबकर साहेबांनी नेहमीच विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देणारा विचार दिला. त्यांनी शेळी-मेंढी पालन या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली.संपूर्ण देशात पशुसंवर्धन क्षेत्रातील त्यांचे योगदान आज दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे इथल्या सामान्य शेतकरी व धनगर बांधवांची आर्थिक स्थिती सुधारली असून राहणीमानाचा दर्जाही उंचावला आहे.

यावेळी निंबकर परिवारातर्फे पद्मश्री बनबिहारी निंबकर यांच्या कन्या डॉ.नंदिनी निंबकर यांनी निंबकर साहेबांसोबत काम केलेल्या, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व त्यांना तन, मन, धनाने मदत करणाऱ्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र दादा पवार,डॉ.नंदिनी निंबकर, डॉ.मंजिरी निंबकर, डॉ.चंदा निंबकर, झिरपे साहेब, चंद्रशेखर बारसकर, प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झिया कुरेशी, समीरा कुरेशी, डॉ.घळसाशी, डॉ.जे.टी पोळ, डॉ.प्रसाद जोशी,सी. एल देशमुख, माधुरी देशपांडे, ॲड.मधुबाला भोसले, डॉ.प्रियदर्शनी कर्वे, रणजित निंबाळकर, पत्रकार मुकुंद जोशी, महाराष्ट्र शेळी मेंढी संशोधन व विकास संस्था, प्रगत शिक्षण संस्था, निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोमीनाथ घोरपडे यांनी केले तर आभार मधुरा राजवंशी यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!