दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२२ । सातारा । ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत दिला जाणारा पद्मश्री श्री.बी.व्ही. निंबकर उत्कृष्ट शेळीपालक/मेंढीपालक पुरस्कार-२०२२ नुकताच श्री. बापू दिलीप केसकर मु.पो.राजाळे, ता.फलटण जि.सातारा व श्री. बंडोपंत बाळू हराळ, मु.पो. खुपिरे, ता.करवीर जि. कोल्हापूर यांना दि. २९ मे २०२२ रोजी प्रदान करण्यात आला.
श्री. बापू केसकर मागील १२ वर्षांपासून बोअर शेळ्यांचे बंदिस्त व्यवस्थापन करत असून त्यांच्या अनुभवातून सुधारित बोअर शेळ्यांची विक्री तसेच व्यवस्थापना संदर्भात वेगवेगळ्या प्रशिक्षणातून माहितीचा प्रसार विविध माध्यातून करतात.
श्री. बंडोपंत हराळ ८ वर्षांपासून नारी सुवर्णा व दक्खनी मेंढीपालन करतात. पन्हाळा परिसरात अतिवृष्टीच्या ठिकाणी सुद्धा यशस्वीपणे बंदिस्त सुधारित मेंढ्यांचे व्यवस्थापन करून त्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
व्यवसाय उभारणीच्या काळापासून ते यशस्वी शेळीपालक/मेंढीपालक नावारूपास येण्यामागे फलटण येथील निंबकर कृषि संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग (नारी)चा मोलाचा वाटा असल्याचे मनोगत दोघांनी व्यक्त केले आहे. नारी संस्थेमार्फत त्यांचे हार्दिक अभिनंदन.
नारी संस्थेमार्फत परंपरागत शेळीपालन/मेंढीपालन व्यवसायामध्ये काळानुसार सुधारित बदलांची गरज लक्षात घेऊन आनुवंशिक सुधारणा, सुधारित चारा पिके, व्यवस्थापनाच्या सुधारित पद्धती यावर भर देऊन त्या अनुषंगाने विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाते.