स्थैर्य, फलटण, दि. २४: सध्या फलटण, खंडाळा तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. बहुतांश कोरोनाबाधित रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासू लागलेली आहे. सध्या संपुर्ण राज्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे हे सहजासहजी शक्य नाही. त्या मुळे ईतर कारखान्यातुन ऑक्सिजन निर्मिती करून ती कोरोना बाधित रूग्णांना देण्यात येणार आहे. लोणंद, ता. खंडाळा येथील पोलाद निर्मिती करणार्या सोना अलॅाईज या कंपनीमधुन ऑक्सिजन निर्मिती करणे शक्य असल्याचे समजल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कंपनी अधिकारी व शासनाचे अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून लोणंद येथील सोना अलॅाईज कंपनीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्यामुळे लोणंद येथील सोना अलॅाईज या कंपनीमध्ये दररोज २१ टन ऑक्सिजनची निर्मिती करणे शक्य झालेले आहे.
महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार अटीतटीचे प्रयत्न करीत आहे. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांना आगामी काळामध्ये दररोज किमान २१ टन प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील ‘सोना अलॉयज्’ या पोलाद निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या कारखान्यात रोज २१ टन ऑक्सिजन निर्मितीसाठी विजेचा जोडभार वाढवून मागितल्यानंतर अवघ्या २४ तासात तो मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.
वर्षांनुवर्षे लोखंडासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद येथील ‘सोना अलॉयज्’ या उद्योगाने साताऱ्यासह महाराष्ट्राला प्राणवायूची संजीवनी देण्यासाठी ‘ऑक्सीजन’ निर्मितीला सुरवात केली आहे. गेली काही महिने हा उद्योग अडचणीत असल्याने त्याने आपला विजेचा जोडभार कमी केला होता. मात्र आज राज्याला ‘ऑक्सिजन’ची नितांत गरज असल्याने विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नामधुन ‘सोना अलॉयजने त्यांच्या कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून अतिरिक्त किमान २१ टन ऑक्सिजन निर्मिती करण्याची तयारी दाखविली. यासाठी ८०० केव्हिएचा भार वाढवून मागितला होता व त्यास तातडीने मंजुरी सुध्दा देण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकारी व महावितरण वरिष्ठ प्रशासन यांचे प्रयत्नांतून २४ तासांमध्ये अतिरिक्त ८०० केव्हीए इतका जोडभार जोडून मिळाला. ऑक्सिजनची गरज पाहता प्रकल्पाची तातडीने चाचणी घेऊन उत्पादन सुरू करत आहोत, अशी माहीती सोना अलॅाईजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रदीप राऊत यांनी दिली.