वाट पाहतंय आपली… भिलार गाव.. आपलं पुस्तकांचं गाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रोबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले… सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले असं भिलार गाव… पुस्तकांचं गाव झालं…. मराठी साहित्याला सोनेरी झळाळी देणारा आणि प्रत्येक रसिक वाचकला दोन्ही बाहु पसरुन खुलेपणानं आमंत्रण देणारा असा हा प्रकल्प देशभर गाजला… रोजचे पर्यटक तर येतातच पण आजपर्यंत मोठ्या प्रमाणात शालेय सहली इथे आल्या… लाखोंहून अधिक विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या गावाने मोहून टाकले. स्ट्रॉबेरीची गोडी आणि प्रत्येक पुस्तकाच्या घरात जावून फोटो काढण्याचा मोह… यातून भिलार गावाचे आकर्षण वाढले… पुस्तकांचं भारतातलं पहिलं गाव महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनाही भुरळ घालत आहे.

दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या पार्श्वभूमीवर या गावाला दिलेल्या भेटीच्या आठवणी पुन्हा रुंजी घालू लागल्या आहेत. ४ मे २०१७ या दिवशी महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाच्या वतीने अनोखं पुस्तकांचं गाव भिलार साकारण्यात आलं … आज या पुस्तकाच्या गावामध्ये ३५ घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी वाचन-चळवळ वाढविण्यासाठीचा हा प्रकल्प. प्रकल्पास भेट देणाऱ्या वाचक / पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ललित व वैचारिक, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास या वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालने उभी केली आहेत. निवडलेल्या ३५ घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या ठिकाणी संतसाहित्य-अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे याची माहिती मिळते.

केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले आहे. ३५ घरांत वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्यांच्या आवडीप्रमाणे वाचन करता येते. जवळपास मोठ्या प्रमाणात मराठी पुस्तके या गावात ठेवण्यात आली आहेत आणि त्यात दिवसेंदिवस भर पडते आहे.

प्रकल्पासाठी निवडलेल्या घरांची व ठिकाणांची नावे : हिलरेंज हायस्कूल – बालसाहित्य, नितीन प्रल्हाद (बाळासाहेब) भिलारे – कादंबरी, ‘अनमोल्स इन’ राहूल भिलारे- महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती, ‘शिवसागर’ सुभाष भिलारे- विज्ञान, श्री हनुमान मंदिर – नियतकालिके व साहित्यिक प्रदर्शनी , ‘साई व्हॅली पॅलेस’ विजय भिलारे- इतिहास, , गणपत भिलारे- ‘दिवाळी अंक’, ‘कृषी कांचन’ शशिकांत भिलारे – चरित्रे व आत्मचरित्रे व बोलकी पुस्तके, ‘मंगलतारा’ प्रशांत भिलारे- शिवकालीन इतिहास व गडकिल्ले, अभिजित दत्तात्रय भिलारे- परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास, प्रवीण भिलारे – कथा, अनिल भिलारे – स्त्री साहित्य, नारायण वाडकर – लोकसाहित्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – बालसाहित्य, सुहास काळे – ललित गद्य व वैचारिक, श्रीराम मंदिर साहित्यिक (प्रदर्शन) आणि भाषीक व साहित्यिक खेळ, संतोष सावंत – विनोदी, जिव्हाळा, आकाश भिलारे – विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते, गणपत पारठे – विविध कलांविषयक, मयूर रिसॉर्ट, अजय मोरे – निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण, श्री जननीमाता मंदिर, संत साहित्य, श्री जननीमाता मंदिर (श्री गणपती मंदिरा जवळ) – साहित्यिक प्रदर्शनी आणि गिरीजा रिसॉर्ट – कविता.

पुस्तकाचं गावं नेमकं आहे तरी कसं…!

  • ३५ घरात ४० हजार पुस्तकांचा खजिना.
  • पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध.
  • साहित्य प्रकारानुसार दालनातील पुस्तकांची मांडणी – साहित्यानुसार भिंतीवर भित्तीचित्रे
  • गावात कथाकथन अनं कविता वाचनाचे आयोजन.
  • पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशक.
  • अंधांसाठी ऑडीओ बुक (बोलकी पुस्तके)

पर्यटकांच्या साक्षीने नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे

शासनाने राबविलेला अत्यंत चांगला उपक्रम आहे. येथे आल्यानंतर दूर्मिळ पुस्तके पाहायला, वाचायला मिळाली. मोबाईल, टीव्हीच्या विश्वात वाचनसंस्कृती टिकविणारा एक चांगला उपक्रम आहे.

असे पुस्तकावे गाव कुठेही पाहिले नाही. येथील पुस्तके पाहुन वेगळाच आनंद झाला. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आणि आगळा वेगळा आहे. अशा भावना पुस्तकाच गाव भिलार येथे येणारे पर्यटक व्यक्त करीत आहेत.

विविध घरांमध्ये शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले या विषांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास, कथा, कांदबऱ्या, कविता संग्रह यासह अनेक पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या गावामध्ये साक्षात ज्ञानाची गंगा आली आहे. गावामध्ये पुस्तक प्रेमी, पीएचडी करणारे विद्यार्थी येत आहेत. या गावाची स्ट्रोबेरी बरोबर पुस्तकाच गाव अशी ओळख निर्माण झाली आहे.

पुस्तकं आयुष्याला वळण देतात…. अनुभव, विचार, ज्ञान बळकट करतात…. पुस्तकाची गोडी लागण्यासाठी पुस्तकांचा सहवासही महत्वाचा असतो त्यासाठी पुस्तकाचं गाव भिलार हा एक अभिनव उपक्रम आहे आणि गावकऱ्यांचा सहभाग याचं उत्तम उदाहरण असणार पुस्तकाचं गाव भिलार हा अभिवन उपक्रम आहे.

– वर्षा पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी, सातारा


Back to top button
Don`t copy text!