स्थैर्य, फलटण : शहरालगतच्या कोळकी गावामध्ये स्वतंत्र पोलीस चौकी व्हाव्ही या साठी स्व. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील, विद्यमान गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील यांच्या कडे सतत पाठपुरवठा केलेला होता. त्या वेळी कोळकीच्या ग्रामसभेमध्ये पोलीस चौकी करण्याचा ठराव पारित करण्यात आलेला होता. परंतु त्या वेळ पासून निधी अभावी कोळकीची पोलीस चौकी होऊ शकली नाही. विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी पोलीस चौकीसाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचे कोळकी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले गेले पाहिजेत असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे स्पष्ट केले.
कोळकी ग्रामपंचातीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे यांनी कोळकी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून दिलेली होती. व त्या नुसारच कोळकी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव पारित करून पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून दिलेली होती. त्या वेळी जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी त्वरित पोलीस औट पोस्ट चालू करण्याचे आदेश दिलेले होते. त्या नुसार कोळकी ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये पोलीस औट पोस्ट सुरु करण्यात आलेले होते. परंतु पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ते पुन्हा बंद करावे लागले, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
कोळकी गावातील व परिसरातील गुन्हेगारी, चोरी, अवैध्य धंदे यावर कोळकी पोलीस चौकी झाल्यानंतर नक्कीच नियंत्रण येईल. कोळकी पोलीस चौकीसाठी फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचेही कोळकी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो असेही जयकुमार शिंदे म्हणाले.