अन्यथा जिल्ह्यात काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय

रणजितसिंह देशमुख ; काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी, ब्लॉक अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक


स्थैर्य, 15 जानेवारी, सातारा : भारतीय जनता पक्षाचे धोरण शेतकरी, शेतमजूर, कामगार व वंचितांच्या विरोधी आहे. भाजपद्वारे हा सगळा समाज मातीमोल करण्याचे काम सुरू असताना जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा पराभव करणे हे काँग्रेसचे प्रथम लक्ष आहे. परंतू काँग्रेस पक्षाला गृहीत धरून कोणी भूमिका घेणार असेल तर काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल असा निर्णय काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रणजितसिंह देशमुख यांनी म्हटले आहे, की जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी, ब्लॉक अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक घेण्यात आली. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा भाजपला सत्ता मिळवणे जास्त महत्वाचे वाटते. सत्तेसाठी भाजपचे अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू असून त्यांनी पैशाचा प्रचंड वापर सुरू केला आहे. दडपशाही आणि दहशत मजवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने खुलेआम सुरू केले आहे. सामान्य माणसांना अधिक कमजोर बनवणार्‍या भाजपला पराभूत करण्यासाठी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस जोमाने प्रयत्न करणार आहे.

जिल्ह्यातील समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत काँग्रेस निश्चित योग्य भूमिका घेईल, मात्र आघाडीतील घटकपक्षांनी व इतरांनी काँग्रेस पक्षाला सन्मानाने विचारात घेऊन निर्णय घेतले पाहिजेत. अन्यथा काँग्रेस पक्ष संपूर्ण जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार आहे. काँग्रेसच्या प्रदेश स्तरावरून तशा सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते एकजुटीने निर्णय घेतील असे आजच्या बैठकीत सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी व ब्लॉक अध्यक्षांनी ठामपणे स्पष्ट केले आहे. यावेळी जिल्हापरिषद निवडणुसाठी निरक्षकांची नेमणूक करण्यात आली. कराड -प्रताप देशमुख, पाटण – झाकीर पठाण, खटाव – संजय तडाखे, वाई – सौ. रजनी पवार, माण व खंडाळा – अमर करंजे, फलटण – जगन्नाथ कुंभार, सातारा – सौ. सुषमाराजे घोरपडे, कोरेगाव – बाबासाहेब कदम, जावळी व महाबळेश्वर – पांडुरंग यादव यांची तालुकानिहाय निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

बैठकीस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस भानुदास माळी, जेष्ठ नेते विजयराव कणसे, बाबासाहेब कदम, झाकीर पठाण, नगरसेवक पंकज पवार, संजय तडाखे, सुषमाराजे घोरपडे, प्रताप देशमुख, पांडुरंग यादव, नाजीम इनामदार, अमर करंजे, राजेंद्र शेलार, रफिकशेठ बागवान, जगन्नाथ कुंभार, आनंदराव जाधव, पार्थ गायकवाड, संभाजी उतेकर , ब्लॉक अध्यक्ष सर्वश्री महेंद्र सूर्यवंशी (फलटण) डॉ. संतोष कदम (पाटण), अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण (कोरेगाव), बाबासाहेब माने (माण), सौ. रजनी पवार (सातारा), विलास पिसाळ (वाई), डॉ. विजय शिंदे (खंडाळा), सदाशिव खाडे (खटाव) व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!