
दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । सातारा । छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या माहुली येथील समाधीची मूळ जागा सापडली आहे. येथील हरिनारायण मठाच्या इसवी सन 1756 मधील ऐतिहासिक कागदपत्रावरून हा शोध लागला आहे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के व जिज्ञासा मंचच्या वतीने झालेल्या सखोल संशोधनातून या संदर्भातले मूळ दस्तऐवज गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मांडण्यात आले या शोध मोहिमेमुळे संबंधित समाधी क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे
येसूबाई फाउंडेशन चे संस्थापक सुहास राजेशिर्के आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे निलेश पंडित यांच्या उपस्थितीत ही माहिती देण्यात आली .यासंदर्भात बोलताना निलेश पंडित म्हणाले संगम माहुली गावात शिरत असताना डाव्या बाजूला एक मोठा दगडी चौथरा आहे या चौथ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नीचा सगुणाबाई यांचे वृंदावन आणि त्याच्या पाठीमागे सगुणेश्वराचे देवालय आहे . सगुणाबाईंचा मृत्यू 25 जुलै 1748 रोजी झाला या समाधीच्या पुढील बाजूस कृष्णा वेण्णामाईची रथ शाळा आहे .या रथ शाळेला लागूनच पूर्वाभिमुख अवाढव्य एक दगडी बांधकाम दिसते हे दगडी बांधकाम म्हणजेच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांचे समाधी स्थळ आहे . ही समाधी स्थळ वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद आहे या इमारतीवर राजघराण्याशी संबंधित अशी राजचिन्हे कोरण्यात आली आहेत .या समाधीचा शोध ज्या इनामपत्राच्या आधारावर घेतला गेला ती येथील हरिनारायण मठाच्या दस्तऐवजामध्ये मिळून आले यामध्ये 5 नोव्हेंबर 1756 रोजी लिहिण्यात आलेले पत्र असून या पत्राची सुरुवात श्रीमंत महाराज मातोश्री आईसाहेब या नावाने होते .15 डिसेंबर 1749 रोजी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे निधन झाले. सदरच्या पत्रातील श्रीमंत मातोश्री आईसाहेब ही व्यक्ती म्हणजे ताराबाई राणीच होय.
पत्रातील मजकुरानुसार वनमाळी बिनकमनं माळी यांनी शाहूनगर किल्ले सातारा म्हणजे सध्याचा अजिंक्यतारा येथे जाऊन ताराबाई राणीसाहेबांना विनंती केली की हरिनारायण देवाची स्थापना कैलासवासी छत्रपती राजश्री शाहू यांनीच केली .खेड तर्फे वंदन येथील रानात याची स्थापना करण्यात आली होती . मात्र देवालयावर अश्वत्थ वृक्ष उगवल्यामुळे त्याची पडझड झाली होती ताराराणी यांनी सदर देवालयाच्या जीर्णोध्दारासाठी मदत करण्याकरिता जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारातून महाराणी येसूबाईंच्या समाधीचा स्पष्ट उल्लेख असल्याचे सांगण्यात आले . या देवालयाच्या उभारणीसाठी ताराराणी यांनी एक बिघा जमीन देऊ केली होती . या जमिनीच्या चतु :सीमा निश्चित करताना येसूबाईंची घुमटी म्हणजे समाधी असा उल्लेख येतो .असे असले तरी हरिनारायण मठाच्या परिसरात राजघराण्यातील आणखी काही समाधी आहेत त्यामुळे येसूबाई साहेबांच्या समाधीची स्थान निश्चिती करण्याचा अडचणी येत होत्या . मात्र नुकत्याच एका जुन्या नकाशाच्या आधारावर येसूबाई साहेबांच्या समाधी स्थानावर शिका मोर्तब झाले आहे . महाराणी येसूबाई फाउंडेशन राजधानी सातारा व जिज्ञासा इतिहास संशोधन संवर्धन सातारा या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून सदर समाधीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत . या कामांमध्ये माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेश शिर्के यांनी पुढाकार घेतला आहे या कामांमध्ये माहुली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने व हरिनारायण मठाचे ट्रस्टी पांडुरंग नेवसे यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले