स्थैर्य , सातारा , दि.21: राजमाता सुमित्राराजे बहुउद्देशीय बचत गट फेडरेशन आणि नारीशक्ती फाउंडेशन यांच्यावतीने शनिवार दि. २३ ते मंगळवार दि. 26 जानेवारी या कालावधीत खरेदी व खाद्य जत्रा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुष्कर मंगल कार्यालय, विसावा नाका सातारा येथे होणाऱ्या या उपक्रमात महिलांनी तयार केलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थ एकाच छताखाली खरेदी करता येणार असल्याची माहिती फेडरेशन च्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले व नारीशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनिशा शहा यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उदघाटन दिनांक शनिवार दि. २३ रोजी दुपारी १ वाजता,पुष्कर हॉल येथे सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
कोरोना महामारीच्या संकटावर मात करून आपण सर्वजण एक नवीन सुरुवात करीत असताना, महिलावर्ग मागे राहता कामा नये. त्यांनी आपल्या मनातील मरगळ झटकून नव्या जोमाने आपापल्या लहान-मोठ्या व्यवसायांना चालना देऊन पुन्हा आपल्या व्यवसायाची बांधणी करावी आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा यासाठी महिलांचा आधारस्तंभ असलेल्या सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या सहकार्यातून हे चार दिवसाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, सेंद्रिय भाज्या, फळे, एझोटिक भाज्या, खतं, साड्या, विविध प्रकारची ज्वेलरी, गृहपयोगी वस्तू, संक्रांत वाण, सौंदर्य प्रसाधने, मसाले, मातीची भांडी, कापडी पिशव्या, लहान मुलांचे स्वेटर, कपडे असे विविध प्रकारचे स्टॉल आहेत. तसेच प्रदर्शनात येणाऱ्या ग्राहकांना रोज लकी ड्रॉ मधून अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार असून जिल्ह्यातील सर्वानी य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.