
दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा १०३ वा वर्धापन दिन, समारंभ मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कर्मवीर समाधी परिसर सातारा येथे आयोजित केला आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या समारंभास महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व मा.आमदार दिलीप वळसे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे
संस्थेच्या या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यात ज्या थोर व्यक्तींनी भरीव योगदान दिले त्या व्यक्तींचे स्मरण रहावे या हेतूने ,त्यांचे नावे संस्थेच्या सर्व विभागातील आदर्श विद्यार्थी,आदर्श विद्यार्थिनी,आदर्श विज्ञान शिक्षक ,उपक्रमशील शिक्षक,कार्यक्षम गुरुकुल प्रमुख,उपक्रमशील शाळा यांना प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.आमदार दिलीप वळसे पाटील यांचे शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे .तरी या समारंभास सातारा शहरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले आहे.