दैनिक स्थैर्य । दि.२३ जानेवारी २०२२ । मुंबई । भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय पर्यटन दिना’चे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान (1857 ते 1947)’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहे. दि. 25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात येणाऱ्या या वेबिनारमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे पर्यटन संचालक भा. प्र. से. मिलिंद बोरीकर, यांनी केले आहे. उद्योजक विराट कासलीवाल आणि खाकी टुर्स चे संस्थापक भरत गोठोस्कर हे या वेबिनार मध्ये सहभागी होणार आहेत.
या वेबिनारच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका निभावलेल्या महाराष्ट्रातील घटना, घडामोडींची पुन्हा आठवण केली जाणार आहे. 1857 च्या बंडापासून महात्मा गांधीजींच्या काळातील महत्त्वपूर्ण घटनांच्या आठवणींबाबत वेबिनारमध्ये चर्चा केली जाणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या महाराष्ट्रातील चळवळीतील महत्त्वपूर्ण आठवणी असलेल्या ठिकाणांबाबत वेबिनार, टूर्स, हेरिटेज वॉक आदींचे आयोजन विशेषत: युवा पिढीसाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. यामुळे थोर स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य मिळविण्यात सहभाग असणाऱ्या या शूर क्रांतीकारकांविषयी नवीन पिढीला माहिती मिळेल, अशी अपेक्षा श्री.बोरीकर यांनी व्यक्त केली आहे.