दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । मुंबई । भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून कांदिवलीमधील ग्रोवेल्स १०१ मॉलमध्ये १० ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी बोरिवलीच्या डॉ एस राधाकृष्णन शाळेच्या ८५ पेक्षा जास्त मुलांनी देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ ‘बियॉंड द बाउंड्रीज – आर्म्ड फोर्सेस’ या विषयावर आधारित एक म्युझिकल फ्लॅश मॉब सादर केला.
शालेय विद्यार्थ्यांनी तब्बल १५ मिनिटे सादर केलेल्या या कार्यक्रमात विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्ये प्रस्तुत करण्यात आली. यावेळी मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या लोकांनी मोठ्या संख्येने हा कार्यक्रम बघितला व टाळ्यांचा वर्षाव करत वातावरणातील उत्साह वाढवला. आपल्या देशाविषयीचे प्रेम व अभिमान सर्व प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसून येत होता. विद्यार्थ्यांनी आपल्या देशाची महानता आणि समृद्ध वारसा याविषयी माहिती देत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सर्वांच्या मनाला भिडणाऱ्या ‘जय हिंद’ जयघोषाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
ग्रोवेल्स १०१ मॉल त्यांच्या आजूबाजूच्या भागात आणि एकंदरीत समाजात कल्याणकारी कामे करण्यात सक्रिय पुढाकार घेण्यासाठी वचनबद्ध आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना अँटी-पोल्युशन मास्क्स मदत म्हणून पुरवणे, एसजीएनपीच्या आदिवासींना सौर दिवे मदत म्हणून पुरवण्यात मदत करण्यासाठी ग्राहकांना सामावून घेणे, मॉलच्या प्रवेशद्वारासमोरील फ्लायओव्हर भिंतीचे सुशोभीकरण असे अनेक सामाजिक उपक्रम ग्रोवेल्स १०१ मॉलमार्फत राबवण्यात आले आहेत.