कमला निंबकर बालभवनमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाचे पाहुण्यांकडून कौतुक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। फलटण । येथील कमला निंबकर बालभवन शाळेत विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञान दिनाचे औचित्य साधून वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ , डॉ. आनंद कर्वे, महिला शास्त्रज्ञ डॉ. चंदा निंबकर, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, डॉ. नंदिनी निंबकर, प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झिया कुरेशी, डॉ. मंजिरी निंबकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाची पाहणी करून मुलांशी गप्पा मारल्या.

प्रदर्शनामध्ये इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी ’कुतूहल‘ या दालनात त्यांना पडणार्‍या प्रश्नांची प्रभावी मांडणी केली होती. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी वर्गात होणारी भांडणे, मोबाईलचा वापर, कुरकुरे आणि चिप्सचे सेवन, दात घासणे, आणि धूम्रपान असे दैनंदिन जीवनातील पाचविषय निवडून शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांकडे कसे बघायचे याचा विचार करून मांडणी केली होती. सहावी ते नववीच्या वर्गांनी व्यक्त होण्याची इतर अनेक माध्यमे वापरली होती. यांमध्ये शॉर्ट फिल्म, रील्स, छायाचित्रे, खेळ, चमत्कार व हातचलाखी मागील विज्ञान दाखवणारे प्रयोग, वर्तमान पत्रातील फसव्या जाहिरातींची कात्रणे, वादविवाद, नाटक, पथनाट्य रॅप असे अनेक माध्यमप्रकार प्रभावीपणे हाताळलेले पाहायला मिळाले.प्रदर्शन बघण्यासाठी दोनशे पालकांची उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी, ता. फलटण पाचवी ते सातवीचे विद्यार्थीही प्रदर्शन पाहण्यास आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी डॉ. रथ यांच्यासोबत ’वैज्ञानिक दृष्टिकोन‘ म्हणजे काय‘ हे समजावून घेण्यासाठी ऑनलाइन संवाद साधला होता. प्रदर्शन पाहिल्यानंतर ’तुम्ही मी ऑनलाइन‘ सत्रामध्ये मांडलेल्या गोष्टींचे सोने केले, हे मलाही जमले नसते, असे मनोगत डॉ. रथ यांनी व्यक्त केले. आधीपासून शोध लागलेल्या गोष्टींची चर्चा करतानाच ज्याची उत्तरे मानवाला गवसलेली नाहीत त्याबद्दलही मुला-मुलींनी बोलत राहावे आणि ’का‘ हा प्रश्न विचारण्यापेक्षा ’कसे‘ या प्रश्नावर विचार व्हावा असे सुचवले. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक यांनी घेतलेल्या मेहनतीचे पाहुण्यांनी कौतुक केले.


Back to top button
Don`t copy text!